Pimpri News : शहरातील रात्रीच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी स्वंयसेवकांची गस्त सुरु
पोलीस आयुक्तांचा 'व्हिलेज डिफेन्स पार्टी' उपक्रम
एमपीसी न्यूज – शहरातील रात्रीच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या सोबत रात्र गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी यासाठी ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ किंवा ‘ग्राम सेवा दल’ हा उपक्रम शहरात मागील काही दिवसांपासून सुरु केला आहे.
रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत दररोज एका पथकाने आपापल्या परिसरात गस्त घालायची आहे. एक पथक आठवड्यातून एकच दिवस गस्त घालेल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या होणाऱ्या चोरी, घरफोडी, वाहनांची चोरी व तोडफोड तसेच, इतर गुन्हे वाढत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळणे कठीण जात आहे. यावर पर्याय म्हणून रात्र गस्त घालण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ हा उपक्रम शहरात सुरु केला आहे.
बॉम्बे पोलीस कायदा 1951 कलम 63 नुसार पोलीस आयुक्तांना नागरिक व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ ची स्थापना करता येते. बॉम्बे पोलीस मॅन्युअलमधील तरतूदी नुसार हे पथक रात्र गस्त घालण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीत देखील मदत करू शकते.
पिंपरी चिंचवड शहरात ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ हा उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जात आहे. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत दररोज एका पथकाने आपापल्या परिसरात गस्त घालायची. दररोज वेगळे पथक गस्त घालेल. एक पथक आठवड्यातून एकच दिवस गस्त घालेल, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. ही संकल्पना राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सामाजिक संस्थांना पुढे येण्याचे आवाहन केले. सामाजिक संस्थांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.
शहरातील काही पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरु होऊन एक आठवडा झाला आहे तर, काही ठिकाणी याची नुकतीच सुरुवात होत आहे. या उपक्रमासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नाने राबवला जाणारा ‘व्हिलेज डिफेन्स पार्टी’ या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.