Pimpri News: एकचा नव्हे दोनचा प्रभाग? प्रभागपद्धतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय

एमपीसी न्यूज – एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले. असले तरी एकसदस्यीय पद्धतीने निवडणूक होण्याची शक्यता नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. किती सदस्यीय प्रभागपद्धत निश्चित असावी, हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा असतो, असे सांगत प्रभागपद्धतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रारूप रचना करण्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे. महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत एकसदस्यीय प्रभाग असणार असून, पुणे, पिंपरी-चिंचवडसह महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग पद्धतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. प्रभागरचना करण्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. मात्र, किती सदस्यीय प्रभागपद्धत निश्चित असावी, हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा असतो.

याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या प्रमुख मंत्र्यांची अनौपचारिक बैठक नुकतीच पार पडली. त्यात महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती सदस्यीय प्रभागपद्धत निश्चित करावी, याबाबत चर्चा झाली. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यापर्यंत घेण्यात येईल. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारकडून काढला जाईल. तसेच यासंदर्भातील विधेयक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मांडून संमत केले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काल सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.