Pimpri News: सुनियोजित प्रचारयंत्रणेमुळेच मतदानाचा टक्का वाढला – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने राबविलेल्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळेच या निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना केला.

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड विजयी झाल्यानंतर एमपीसी न्यूजने दिलेल्या निवडणूक विश्लेषणात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगदानाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याबाबत वाघेरे यांनी एमपीसी न्यूजशी संपर्क साधून आक्षेप नोंदविला.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले, त्यामुळे प्रचारयंत्रणेपासून शहरातील पक्षाचे नेते अलिप्त होते, असे म्हणणे अन्यायकारक आहे, असे वाघेरे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅक ऑफिसने या निवडणुकीत फार महत्त्वाची भूमिका बजावली. मतदारयादीची विभागनिहाय वाटणी करुन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे शहरातील सर्व प्रमुख नेते प्रत्यक्ष मतदारांशी थेट संपर्क साधत होते. या सर्वांचा परिणाम म्हणूनच शहरातील या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी प्रथमच 28 टक्क्यांच्या पुढे गेली. यापूर्वी 18 टक्के मतदान देखील होत नव्हते, याकडे वाघेरे यांनी लक्ष वेधले. मतदार नोंदणीसाठीही पक्ष संघटनेने प्रयत्न केले, असा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी समन्वय साधून शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणूकीत  प्रयत्नांची पराकाष्ठा केली, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.