Pimpri News : पिंपरी-चिंचवड मनपाबद्दल काय वाटतंय सामान्य नागरिकांना ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आज (रविवारी) 38 वर्ष पूर्ण करत आहे. अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने 4 मार्च 1970 रोजी नगरपालिका स्थापन करण्यात आली. त्यानंतर लोकसंख्येच्या निकषानुसार अल्पावधीतच म्हणजे 11 ऑक्टोंबर 1982 रोजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. 38 वर्षांच्या या वाटचालीत शहराने ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदे मिळवल्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा ‘एमपीसी न्यूज’ने प्रयत्न केला.

  प्रमोद शिंदे – चिंचवडगाव
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 38 वर्षातला प्रवास प्रगतीच्या दिशेने जाणाराच आहे. मग शहराची औद्योगिक शहर किंवा आयटी हब म्हणून झालेली ओळख असो की इतर विकासकामे पालिकेने अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे असं मला वाटतं. सोबत इतर समस्या देखील वाढत आहेत त्याकडे देखील स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे. झोपडपट्टीसारखी समस्या अजूनही तशीच आहे. रस्ते व पाणी प्रश्न सोडविले पाहिजेत त्यामुळे स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने पालिकेने अजून भरीव कामगिरी करणं आवश्यक आहे.

आकाश गायकवाड , चिंचवड
महानगरपालिकेचा आतापर्यंत झालेला प्रवास खूप चांगला आहे. शहरात वेगाने झालेलं औद्योगिकीकरण शहरासाठी एक सकारात्मक बाब आहे. शहराचा बीआरटीपासून मेट्रोपर्यंतचा प्रवास खरच प्रगतीचं आणखी एक द्योतक आहे. असे असले तरी शहराला विविध समस्यांनी ग्रासलं आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा, रस्ते, वाढलेली गुन्हेगारी, कचरा, अस्वच्छता या समस्यांवर पालिकेने नियोजनबद्ध काम केलं‌ पाहिजे.

 गालिब खान, आकुर्डी 
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 38 वा वर्धापन दिन साजरा होता असताना शहरात कोरोनाचे आक्रमण झाले आहे. लोकप्रतिनिधींसह अनेक नागरिकांचा या कोरोनाने बळी घेतला आहे. आशिया खंडातील श्रीमंत महापालिका म्हणून आपल्या महापालिकेचा गौरव होतो. त्याचा आम्हालाही अभिमान आहेच. पण, कोरोना संकट काळात सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना महापालिकेच्या आणि खासगी रुग्णांलयात बेड उपलब्ध होत नाहीत, अशी ओरड आहे. त्यामुळे श्रीमंत महापालिका आरोग्य सुविधांबाबत गरीब असल्याचे दिसते.

 विजय शिंदे, भोसरी
शहराचा झपाट्याने विकास झाला. खेडेगावांचे अल्पावधीत महानगरात रूपांतर झाले. ग्रामीण संस्कृती जपतानाच शहराने आधुनिकतेची कास धरली. ग्रामीण संस्कृतीचे समृद्ध नागरी जीवनात झालेले रूपांतर आश्चर्यकारक आहे. 38 वर्षांतील वाटचाल पाहता, शहराचा पूर्णपणे कायापालट झाला आहे.

 जयवंत बालघरे, चिखली, कुदळवाडी
चिखली गाव पालिकेत समाविष्ट होण्याआधी खूप चांगले होते. जशी पालिका आली तशी वाईट अवस्था झाली. मूलभूत सोयीसुविधांची पार वाट लागली आहे. गावाच्या चारही बाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तर गावाच्या हद्दीत भंगाराच्या गोदामांनी बकालपण वाढले आहे. भंगारवाल्यांकडून मलिदा मिळत असल्याने महापालिका प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. महापालिका आल्याने पवित्र इंद्रायणी गटारगंगा बनली. वायू प्रदूषणाने आम्हा ज्येष्ठांचा जीव गुदमरतोय. प्राधिकरणातील नागरिकांप्रमाणे आम्ही टॅक्स भरतो मात्र, आम्हाला कोणत्याही सुविधा नाहीत. चिखली गाव महापालिकेत समाविष्ट करून गेल्या 22 ते 23 वर्षांत आम्हाला काय मिळाले. जल आणि वायू प्रदूषण व दुर्गंधीचा सामना करीत आम्ही जगतोय. या नरकयातना दूर कराव्यात एवढ्याच महापालिका वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थांच्या अपेक्षा.

 बाळासाहेब तुकाराम तरस – किवळे
किवळे विकासनगर हे गाव 1997 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाले. महापालिकेची पहिली निवडणूक 2002 ला झाली. तेव्हापासून येथील आरक्षित जागेपैकी एकही जागा ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आले नाही. परिणामी गावचा काहीही विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे किवळे गाव नगरपालिकेमध्ये गेलेले आहे किंवा नाही हा मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे. ज्येष्ठांसाठी गार्डन तसेच भाजी मंडई, अग्निशमन केंद्र या आवश्यक सुविधांची वानवा आहे. अनेक अडचणींचा स्थानिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश होऊन काय मिळाले, असा साधा प्रश्न विकासनगर आणि किवळे गावातील नागरिकांना पडला आहे.

गणेश भाट – मेडिकल व्यावसायिक
पालिकेने आणखी लोकाभिमुख व्हायला हवं. अनेक विषयांच्या मागण्यांसाठी नागरिकांना अजूनही आंदोलने करावी लागत आहेत; हे दुर्दैव आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे माध्यमांमधून वाचायला मिळतात, हे सुद्धा मन सुन्न करणारं आहे. राजकीय आरोप – प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने काम करायला हवं. आजवरच्या कामाबद्दल काही बाबतीत समाधान नक्कीच आहे.

  राहुल मखरे, थेरगाव 
औद्योगिक नगरी म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आमच्या सारख्या बाहेर गावच्या होतकरू तरुणांना रोजगार मिळाला. शहराची प्रगती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि ती निश्चित एक चांगली बाब आहे.

 शैलेश बाळकृष्ण शिंदे, आकुर्डी
महानगरपालिकेची कामगिरी सुमार‌ दर्जाची राहिलेली आहे असं मला वाटतं. पालिका हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. वायसीएम रुग्णालयाच्या धर्तीवर प्रभागवार हॉस्पिटल उभे राहणे गरजेचे होते ते होऊ शकले नाही. त्यामुळे, आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे आणि कोरोनाकाळात तो आणखी प्रकर्षाने जाणवला.

खासगी शाळांच्या तोडीच्या पालिकेच्या शाळा तयार झाल्या नाहीत. रस्त्यांवर तर खड्यांचे साम्राज्य झालेत, खड्डे वेळेत न बुजवणे यामुळे वाहतूकीला अडथळा नित्याचाच. शहरात कचरा, पाणी, आरोग्य, शिक्षण या समस्या गंभीर बनत चाललेल्या आहेत उड्डाणपूल, मेट्रो म्हणजे विकास नाही जनतेच्या मुलभूत समस्या सुटणे म्हणजे विकास.

 तौसिफ शेख – रहाटणी 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका 38 वर्ष पूर्ण करत आहे. शहराचा सर्वांगीण विकास खरंच वाखाणण्याजोगा आहे. औद्योगिक नगरी व‌ आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर लाखो कामगारांना उपजीविका पुरवते. शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असून ही आनंदाची बाब आहे. असे असले तरी शहरात गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या घटना वाढत आहेत यासाठी पालिका आणि पोलिसांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यासाठी अजून ठोस काम करणे गरजेचे आहे‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.