Pimpri News : आयुक्तसाहेब ‘स्पर्श’च्या चौकशी अहवालाचे काय झाले ?

90 दिवस उलटले तरी अहवाल सभा पटलावर नाही; 10 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महापौरांचे होते आदेश

एमपीसी न्यूज – कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नसतानाही फॉर्च्युन स्पर्श संस्थेला अदा करण्यात आलेल्या 3 कोटींच्या बिलांची चौकशी 10 दिवसात पूर्ण करण्याचा महापौरांनी आदेश देऊन 90 दिवस उलटले तरी, चौकशीचा फेरा सुरुच आहे. 3 महिने उलटूनही सभा पटलावर अहवाल ठेवण्यात आयुक्त चालढकल करत आहेत. आता उद्या (शुक्रवारी) होणा-या जून महिन्याच्या महासभेत तरी आयुक्त राजेश पाटील ‘स्पर्श’चा अहवाल सादर करणार का, की पुन्हा वेळ मारुन नेणार, याबाबत नगरसेवकांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. त्याकरिता ‘अ’,’ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये विभागणी करुन कोविड सेंटर कार्यान्वित केले होते. भोसरी येथील स्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन ठिकाणी ‘अ’ श्रेणीतील कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याकामी फॉर्च्युन स्पर्श संस्थेला 7 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी कार्यरंभ आदेश दिला होता. त्याकरिता 1239 प्रतिदिन प्रतिबेड इतका दर निश्चित करण्यात आला होता.

परंतु, या सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झाला नसतानाही ‘स्पर्श’च्या व्यवस्थापनाकडून महापालिकेला 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बिले सादर केल्याचा प्रकार लिपिकाच्या टिप्पणीतून उघडकीस आला होते. त्यावर आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतरही प्रशासनाने स्थायी समितीची मान्यताही न घेता स्पर्शला 3 कोटी 14 लाख 1 हजार 900 रुपयांचे बिल अदा केले.

फेब्रुवारी महिन्याच्या तहकूब झालेल्या 9 मार्च 2021 रोजीच्या सभेत याबाबत 4 तास घमासान चर्चा झाली. नगरसेवकांच्या तीव्र भावना जाणून घेतल्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी ‘स्पर्श’ला अदा करण्यात आलेल्या बिलांची सखोल चौकशी करावी. रात्रंदिवस चौकशी करुन 10 दिवसांत म्हणजेच 20 मार्चच्या सर्वसाधारण सभेत चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते.

मात्र, आयुक्तांनी 10 दिवसांत अहवाल सादर केला नाही. महापौरांच्या आदेशाला 90 दिवस पूर्ण होत आले तरीही अहवाल सादर केला नसल्याने आयुक्तांनी महासभेचा अवमान केल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत. आयुक्त कोणाला पाठीशी घालतात, असा सवाल नगरसेवकांचा आहे.

30 एप्रिल रोजी झालेल्या विशेष सभेत नगरसेवकांनी अहवालाबाबत आवाज उठविला. ‘स्पर्श’ संस्थेच्या चौकशीचा अहवाल आयुक्तांनी सभागृहाच्या पटलावर का, ठेवला नाही. महापौरांनी 10 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला असतानाही आयुक्तांनी महापौरांच्या आदेशाची कोणाच्या आदेशावरून पायमल्ली केली. आयुक्तांनी महापौरांचा आदेश डावलून संविधानाचा अनादर केला. आयुक्तांनी ‘स्पर्श’चा अहवाल का, दडविला असा सवाल करत नगरसेवकांनी आयुक्तांचा धिक्कार केला होता.

त्यावर दिलगिरी व्यक्त करत आयुक्त राजेश पाटील यांनी चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असल्याने मी त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही. चौकशी समितीला लवकर चौकशी पूर्ण करण्याची विनंती केली जाईल, असे सांगितले होते. त्यालाही दीड महिना पूर्ण झाला. पण, अद्यापही अहवाल काही सभागृहाच्या पटलावर सादर करण्यात आला नाही. आता उद्या होणा-या महासभेत आयुक्त पाटील ‘स्पर्श’चा अहवाल सादर करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून अॅटो क्लस्टरमधील बेडसाठी 1 लाख रुपये घेतल्याप्रकरणी स्पर्शचा ठेका काढून घेण्यात आला आहे.

याबाबत भाजप नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ”कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना आणि बोगस कर्मचारी दाखवून स्पर्शने 3 कोटी घेवून महापालिकेची लूट केली आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी तपास होणे आवश्यक असताना 3 महिने उलटून गेले. तरी, चौकशी अहवाल सभा पटलावर ठेवण्यास प्रशासन चालढकल करत आहे. या प्रकरणाचे सत्य जणतेसमोर आले पाहिजे. उद्या महासभेत अहवालाची विचारणार करणार आहे”.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”स्पर्श’च्या चौकशी अहवालाचे काय झाले, याबाबत उद्या सभागृहात आवाज उठविणार आहे. सभापटलावर अहवाल सादर करण्याची मागणी केली जाईल”.

याबाबत बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ”’स्पर्श’ला 3 कोटी रुपये दिलेल्या बिलांची चौकशी 10 दिवसात पूर्ण करण्याचा आदेश आयुक्तांना दिला होता. परंतु, अद्यापही प्रशासनाने आपल्याला अहवाल दिला नाही. चौकशी चालू असल्याचे सांगितले जाते. याबाबत आयुक्तांना विचारणा करणे गरजेचे आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.