Pimpri corona News: ‘मुर्दो से क्या डरना’; गेले पाच महिने ‘हे’ हात करताहेत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार

मृत कोरोना रुग्णांवर 'असे' होतात अंत्यसंस्कार : 'What to be afraid of the dead', This Hand Corona's corpse funeral for the last five months

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे. विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वजण सुरक्षित अंतर पाळून खबरदारी घेत आहेत. पण, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणारे कसे सुरक्षित अंतर बाळगणार…त्यांना थेट मृतदेहालाच स्पर्श करावा लागतो. त्यामुळे त्यांना कसली भीती आणि काय…मागील पाच महिन्यांपासून वायसीएम रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण प्रक्रिया आठ कर्मचारी पार पाडत आहेत. ‘जिंदो से डर, ‘मुर्दो से क्या डरना’ अशी प्रतिक्रिया कोरोना मृतदेहाची संपूर्ण प्रक्रिया करणारे कर्मचारी प्रकाश साळवे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. दिवसाला 18 ते 20 जणांचे मृत्यू होत आहेत. शहरातील 662 आणि महापालिका हद्दीबाहेरील 127 अशा 789 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्यावर पालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात. भोसरी, निगडी, लिंक रोड चिंचवड येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत आणि सांगवीतील गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात.

‘असे’ होतात अंत्यसंस्कार

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्याबाबत सरकारने नियमावली दिली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास तीस मिनिटाच्या आतमध्ये मृतदेह बेडवरुन वेगळ्या खोलीत ठेवला जातो. मृतदेह प्लॉस्टिकने बांधला जातो. त्यानंतर पुढील दोन तासात शवविच्छेदन कक्षात हलविला जातो.

यासाठी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात चार-चार जणांच्या दोन वेगळ्या टीम कार्यरत आहेत. रुग्णाचा मृत्यू झालेल्या ठिकाणी जाऊन दोघेजण मृतदेह हवाबंद प्लॉस्टिकमध्ये गुंडाळतात. त्यासाठी सुमारे 25 मिनिटांचा वेळ लागतो.

त्यानंतर मृतेदह नातेवाईकांना दाखवून अंत्यविधीसाठी नेला जातो. यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहे. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर कर्मचारी धार्मिक विधी करतात. नातेवाईक आले असतील तर ते लांबूनच दर्शन घेतात.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला जातो. स्मशानभूमीतील कर्मचारी मृतदेह दाहिनीत टाकतात. एका मृतदेहाच्या अंत्यसंस्काराला एक तास लागतो. मृतदेहाचे वजन अधिक असेल तर, दीड तास लागतो. दीड तासात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते.

‘जिंदो से डर, ‘मुर्दो से क्या डरना’

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहाची पूर्ण प्रक्रिया करणारे कर्मचारी प्रकाश साळवे म्हणाले, ‘कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अगोदर मृतदेहाच्या नाका, तोंडात बोळे घेतले जातात. शरीरावर औषधाची फवारणी केली जाते. हात-पाय बांधून मृतदेह स्वच्छ कपड्यात लपेटला जातो.

त्यानंतर पुन्हा औषध फवारणी केली जाते. प्लॉस्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळला जातो. मृतदेह ट्रॉलीवर घेतला जातो. ज्या बेडवर रुग्ण होता. तो बेड स्वच्छ करुन घेतला जातो. जेणेकरुन दुस-या रुग्णाला त्रास होऊ नये.

मृतदेह खाली आणून रुग्णवाहिकेतून स्मशान दाखला असलेल्या स्मशानभूमीत घेऊन जात होते. नातेवाईकांना लांबून चेहरा दाखविला जातो. बाकीचे काही विधी करु दिले जात नाहीत. दहन झाल्यानंतर बाकीचे विधी करण्यास सांगितले जाते’.

कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाटली नाही का असे विचारले असता, साळवे म्हणाले, आम्ही दवाखान्यात काम केले आहे. जिवंत माणसाला घाबरायचे असते. जिवंत माणूसच काहीतरी करु शकतो. प्राण गेल्यानंतर घाबरुन काय फायदा आहे.

‘जिंदो से डर, ‘मुर्दो से क्या डरना’ असेही ते म्हणाले. कोरोनाचे मृतदेह हाताळताना आम्ही पुरेशी खबरदारी घेतो. पीपीई किट, मास्क, ग्लोज घालतो. त्यामुळे आम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”कोरोनामुळे मृत्यू झाल्यास तीस मिनिटांत मृतदेह बेडवरुन हलविला जातो. प्लॉस्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळला जातो. या प्रक्रियेसाठी दोन टीम कार्यरत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत असली. तरी या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ  पुरेसे आहे. मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील मृत रुग्णांसाठी वेगळी स्मशानभूमी आहे. मुस्लिम समाजातील मृत्यू झालेल्यांचे त्यांच्या धार्मिक दफनविधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.