Pimpri News: कोविड योद्ध्यांवर अन्याय होऊ देणार नाही – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – कोविड काळात योद्धा बनून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन महापौर उषा ढोरे यांनी आंदोलकांना दिले.

पालिकेने मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ यांना मिळालेले तात्पुरते काम बंद झाले आहे. काम मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु केले आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांची महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागामध्ये ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल, त्यावेळेस प्राधान्याने कोरोना काळात महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मानधन तत्वावर वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करुन काम देण्यात येईल. त्याबाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

तसेच यापुर्वी वैद्यकीय विभागातील विविध पदावर मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेमध्ये सामावून घेण्याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करुन प्रशासनामार्फत शासनमान्यतेकामी प्रस्ताव सादर केलेला आहे.

कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे त्याठिकाणी मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडीकल स्टाफ यांना मिळालेले तात्पुरते काम बंद झाले आहे.

या कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून कोविड काळात योद्धा बनुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.

तसेच महापालिकेमध्ये ज्या ज्या वेळेस डॉक्टर, नर्सेस तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफची गरज असेल किंवा मानधन तत्वावर असे कर्मचारी भरती करावी लागेल. त्या वेळेस काम देताना कोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सभापती स्थायी समिती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आंदोलकांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.