Pimpri News: ‘डिजिटल’ घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाल्यास पदाचे राजीनामे देऊ; सभागृह नेत्याचे राष्ट्रवादीला आव्हान

एमपीसी न्यूज – पंतप्रधान आवास योजनेतील डिजिटल घोटाळ्याचे आरोप राष्ट्रवादीने सिद्ध करावेत. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही पदाचे राजीनामे देतो. सिद्ध न केल्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असे आव्हान महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिले.

भाजपप्रणित अनेक एजंटनी गोरगरिबांना घरे देतो म्हणून कमिशन लाटल्याच्या नागरिकांच्या असंख्य तक्रारी आमच्या पर्यंत आल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेत डिजिटल घोटाळा होणार होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता.

त्याला महापालिकेतील भाजप पदाधिका-यांनी आज (बुधवारी) प्रत्युत्तर दिले आहे. महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोडती बद्दल घोटाळा झाल्याचा केविलवाणा आरोप भाजपवर केला आहे. मुळात ही सोडत प्रशासनाकडून काढली जाणार होती. ती सोडत जेएनएनयुआरएम सोडती प्रमाणेच संगणकीय पद्धतीनेच असणार होती.

यामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांचा संबंध आला कुठे?. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोडतीत डिझीटल घोटाळा होणार असल्याचा व भाजपाप्रणित एंजटाकडून गोरगरीबांना घरे देतो म्हणून कोट्यवधीचे कमिशन लाटल्याचा बेछुट आरोप केला आहे.

हे आरोप पुराव्यासह सिध्द करावेत; अन्यथा त्यांनी राजीनामे द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास आम्ही पदाचे राजीनामे देतो, असे आव्हान ढाके यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. पंतप्रधान आवास योजनेची सोडत लवकरच काढली जाईल. प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्त कोणाला घाबरले ? – महापौर

आयुक्त श्रावण हर्डीकर कोणाला घाबरले हे माहित नाही. त्यांनी अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द करुन नगरसेवकांचा अपमान केला आहे. आता राजशिष्टाचारानुसारच सोडतीचा कार्यक्रम होईल. राजशिष्टाचाराचा अर्थ आयुक्तांना कळले, असे महापौर उषा ढोरे यांनी ठणकावून सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.