Pimpri news: महापौर ‘या’ कोट्यवधीच्या विकास कामांनाही विरोध करणार का? – राहुल कलाटे यांचा सवाल

महापौर दुसऱ्याच्या हातातले बाहुले बनू नका, आपण भाजपच्या नव्हे शहराच्या महापौर आहात

एमपीसी न्यूज – वाकड येथील रस्ते विकासाचे प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यापासून शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि सत्ताधारी भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा संपण्याचे नाव घेत नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक संकटात एकाच प्रभागात (वाकड) शंभर कोटी रुपये खर्चाची कामे करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न महापौर उषा ढोरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पिंपळेगुरव, सांगवी, च-होलीत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची जंत्री दाखवत या कामांना पण महापौर विरोध करणार का, असा सवाल केला. तसेच महापौर आपण दुसऱ्याच्या हातातले बाहुले बनू नका, भाजपच्या नव्हे तुम्ही शहराच्या महापौर आहात, याची आठवणही कलाटे यांनी करून दिली आहे.

कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील चांगल्या पद्धतीने विकसित होत असलेला भाग म्हणून वाकड- ताथवडे- पुनावळे हा परिसर हा केवळ एक प्रभाग नसून तीन गावे आहेत. याच परिसरातून पालिकेला जास्त मिळकत कर व बांधकाम परवानगी विभागाला सर्वात जास्त विकास निधी मिळतो. तरी देखील या भागातील विकास कामांना भाजप अडकाठी घालते.

दोन दिवसांपूर्वी महाविकासआघाडी सरकारने भोसरी मतदारसंघातील मोशी येथील सफारी पार्कच्या शेकडो कोटींच्या खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तोसुद्धा एकाच प्रभागात खर्च होणार आहे. तुम्ही महापौर म्हणून त्याला विरोध करणार का?, असा सवाल कलाटे यांनी केला आहे.

चऱ्होली भागात शेकडो कोटींची कामे चालू आहेत. त्यालाही विरोध करणार का? पिंपळेगुरव व पिंपळेसौदागर या ठिकाणी तर स्मार्ट सिटीची शेकडो कोटी रुपयांची कामे चालू आहेत. ती पण कामे बंद करणार का? सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण या कामातला फरक पहायचा असेल तर पिंपळेगुरव मध्ये सर्व डांबरी रस्ते उखडून टाकून स्मार्ट सिटीची कामे करून खर्चाचा आकडा फुगवला ते दिसत नाही का? उलट मोठे रस्ते करताना खाली डांबर असेल तर त्यावर काँक्रीटीकरण करत असताना जुन्या रस्त्याची गुणवत्ता नियमाप्रमाणे तपासली का? मागील सर्वसाधारण सभेत स्वतःच्या सांगवी व पिंपळेगुरव या भागात 100 कोटी वरून जास्त रक्कमेचे वर्गीकरण केले. त्यावेळी आपल्याला संपूर्ण शहराची आठवण का नाही झाली, असे अनके प्रश्न कलाटे यांनी विचारले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शहरात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले असताना भाजप सपशेल अपयशी झाल्याचे दिसते. महापौरांनी एखाद्या विशिष्ट प्रभागातील कामात लक्ष्य घालण्याऐवजी शहरातील नागरिकांच्या जीवाची काळजी देखील करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आयुक्तांनी भाजपच्या ठराविक लोकांना कोट्यवधी रुपये लाटण्याची दिली संधी !

आपण महापौर असलो तरीही कोणाच्यातरी हातातले बाहुले आहोत आणि स्वतःचा खेळ करत आहोत हे सुद्धा त्यांना समजत नाही. त्यामुळे महापौर नक्की शहराच्या की भाजपच्या असा प्रश्न उपस्थित होतो. आपण एका विशिष्ट नेत्यांना जे वाटेल ते बोलात आहात.

ज्या आयुक्तांनी भाजपच्या ठराविक लोकांना कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी संधी दिली. आता तेच आयुक्त तुम्हाला भ्रष्टाचार व टक्केवारी घेण्यासाठी वाकड-पुनावळे-ताथवडे भागात विकास कामे करत आहेत असे दिसायला लागले, असेही कलाटे यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.