Pimpri News: पिंपरी-चिंचवडच्या महापौर बदलणार का ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांचा पक्षाअंतर्गत ठरलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल 22 फेब्रुवारीला संपत आहे. त्यामुळे महापौर बदल होणार का, या चर्चेला महापालिका वर्तुळात वेग आला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील भाजपच्या सत्तेला 14 मार्च रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत. या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महापालिकेवर पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलल्यानंतर सव्वा वर्षाचा महापौरपदाचा कार्यकाल कारभा-यांनी ठरविला.

पहिले अडीच वर्ष भोसरीकडे तर दुसरे अडीच वर्ष चिंचवडकरांकडे महापौरपद देण्याचे निश्चित केले. पहिल्या अडीच वर्षासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि दुस-या अडीच वर्षाकरिता महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे.

पहिल्यावेळी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे यांना महापौर तर निष्ठावान शैलजा मोरे यांना उपमहापौरपदी काम करण्याची संधी मिळाली. 14 मार्च 2017 रोजी त्यांची निवड झाली. सव्वा वर्षानंतर 24 जुलै 2018 रोजी काळजे आणि मोरे यांचे पक्षाने राजीनामे घेतले.

त्यांच्या जागी आमदार लांडगे यांचे दुसरे समर्थक राहुल जाधव यांना महापौर तर आमदार जगताप समर्थक सचिन चिंचवडे यांची उपमहापौरपदी 4 ऑगस्ट 2018 रोजी निवड झाली.

त्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर महापौरपदी उषा ढोरे आणि उपमहापौरपदी तुषार हिंगे 22 नोव्हेंबर 2019 रोजी विराजमान झाले. दरम्यान, 14 ऑक्टोबर 2020 रोजी तुषार हिंगे यांचा पक्षाने तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला. त्यांच्याजागी केशव घोळवे यांची 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदी निवड झाली.

महापौर ढोरे यांचा पक्षांतर्गत ठरलेला सव्वा वर्षाचा कालावधी 22 फेब्रुवारी 2021 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौर बदल होणार का, या चर्चेला जोरदार वेग आला आहे. स्थायी समितीचे सर्वच सदस्य बदलण्याबाबत भाजपमध्ये विचारमंथन सुरु आहे. स्थायीच्या सदस्यांबरोबरच महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेते पण बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक आठ ते नऊ महिन्यांवर येवून ठेपली आहे. निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. त्यामुळे महापौर बदल करावा की नाही याबाबत भाजपमध्ये खलबते सुरु असल्याचे समजते. महापौरपद चिंचवडकरांकडे राहणार आहे. त्यामुळे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

महापौर उषा ढोरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल विविध कारणांनी चर्चेत !

महापौर उषा ढोरे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दबावाखाली महापौर काम करतात. रिमोट कंट्रोलनुसार सभागृह चालवितात. मनमानी पद्धतीने कारभार करतात, हेतुपुरस्सरपणे बोलू दिले जात नाहीत, असे आरोप राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांवर केले आहेत.

तसेच आयुक्तांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन अशा विविध कारणांमुळे महापौरांचा कार्यकाळ चर्चेत आहे.

दरम्यान, कोरोना काळात महापौर ढोरे यांनी उल्लेखनीय कार्य केले. वयोमानाचा विचार न करता त्या पूर्ण लॉकडाऊन कालावधीत शहरभर फिरत होत्या. उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना देत होत्या. या काळातील कामाबाबत त्यांचे कौतुक केले जात आहे.

भाजपकडून खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या ‘या’ 21 महिला नगरसेविका !

भाजपकडून तब्बल 39 महिला निवडून आल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. खुला प्रवर्गातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महापौर ढोरे यांच्यासह माया बारणे, आरती चोंधे, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले, संगीता भोंडवे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, सुनीता तापकीर, तर भाजप संलग्न असलेल्या निता पाडाळे, पिंपरीतून शैलजा मोरे, शर्मिला बाबर, कोमल मेवानी, सुजाता पालांडे आणि भोसरीतून भिमाबाई फुगे, सारीका सस्ते, निर्मला गायकवाड, प्रियांका बारसे, सोनाली गव्हाणे तर भाजप संलग्न असलेल्या साधना मळेकर अशा 21 नगरसेविका निवडून आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.