Pimpri News: महिला उद्योजकांनो, ‘पीसीएमसी हिरकणी सन्माना’साठी अर्ज करा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांना आपल्या मराठी मातीमधील आदर्श माता आणि कर्तबगार स्त्री असलेल्या हिरकणी यांच्या नावाने सन्मानित करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने ‘पीसीएमसी हिरकणी सन्मान’ देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. महिला उद्योजकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

आज एकविसाव्या शतकामध्ये अनेक महिला आपले करियर, उद्योग-व्यवसाय सांभाळून कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडतात. एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होतात. त्यामुळे अशा महिलांचा पीसीएमसी हिरकणी सन्मानाचे गौरव करण्यात येणार आहे.

केवळ महिलांनी सुरु केलेल्या, महिलांद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट स्टार्ट अपला सामाजिक संस्थांकडून एक लाख रुपयांची सहाय्यता देण्यात येणार आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना, उपकरण किंवा तत्सम व्यवस्थेकरता 50 हजार रुपयांची सहाय्य देण्यात येणार आहे. सुरक्षिततेविषयी असलेल्या स्पर्धेमध्ये महिला आणि पुरुषदेखील सहभागी होऊ शकतात.

पीसीएमसी हिरकणी सन्मानासाठी नामांकन भरण्याची सुरुवात 8 मार्च पासून सुरु झाली असून अंतिम दिनांक 10 एप्रिल आहे. या स्पर्धेसाठी डॉ. अपूर्वा पालकर, (संचालक – इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि लिंकेजेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड करणार आहे.

पीसीएमसी हिरकणी सन्मानाकरिता स्पर्धेमध्ये पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲपच्या माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्ज ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. पीसीएससीएल हिरकणी सन्मान प्राप्त करण्यासाठी अर्ज भरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ॲपडाउनलोड करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.