Pimpri News: महिला तक्रार निवारण समिती सदस्यांना बैठकीसाठी प्रवास भत्ता मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थापन केलेल्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती तसेच विभाग स्तरावर अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीत सदस्य असलेल्या अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना समितीच्या बैठकींना उपस्थित राहण्यासाठी 200 रूपये प्रतिदिन प्रवास भत्ता मिळणार आहे. तसेच या सदस्यांना ओळखपत्रही दिले जाणार आहे.

महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण अधिनियमानुसार, पिंपरी – चिंचवड महापालिकेमध्ये मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती तसेच विभाग स्तरावर अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या दोन्ही समितींमध्ये अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांची सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. या सदस्याने ओळखपत्र, प्रतिदिन प्रवास भत्ता मिळण्याची विनंती केली आहे.

लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण अधिनियमामध्ये समितीमधील अशासकीय सदस्यांना 200 रूपये प्रतिदिन प्रवास भत्ता, प्रवास खर्च, थ्री टायर वातानुकुलीत रेल्वे, बस, टॅक्सी आणि रिक्षा किंवा प्रत्यक्ष केलेला खर्च त्यामध्ये जो कमी असेल असा खर्च दिला जाईल, असे नमुद केलेले आहे.

त्यानुसार, पिंपरी महापालिकेमध्ये मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समिती तसेच विभाग स्तरावर अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य महणून कामकाज पाहणा-या अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना भविष्यात समितीच्या होणा-या बैठकींना उपस्थित राहण्यासाठी 200 रूपये प्रतिदिन याप्रमाणे प्रवास भत्ता आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे. हा खर्च कामगार कल्याण विभागाकडील ‘महिला तक्रार निवारण समिती खर्च’ या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.