Pimpri News: सक्षम विरोधक म्हणून काम केले – राहुल कलाटे

पक्षाला कधी-कधी कोणाचे तरी हट्ट पुरवावे लागतात

एमपीसी न्यूज – मागील चार वर्षे शिवसेना गटनेता म्हणून काम करत असताना सक्षम विरोधक म्हणून काम केले. चुकीच्या कामांना प्रखरपणे विरोध केला. चुकीची कामे रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचे राहुल कलाटे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सांगितले. पक्षाला कधी-कधी कोणाचे तरी हट्ट पुरवावे लागतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राहुल कलाटे यांनी आज (मंगळवारी) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी वाघमारे यावेळी उपस्थित होते.

राहुल कलाटे म्हणाले, पक्षाच्या आदेशानुसार मी शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. चार वर्षात महापालिकेतील चुकींच्या कामांना विरोध केला. चुकीची कामे थांबविण्याचा प्रयत्न केला. कोविडमधील भ्रष्टाचार, विकासकामांमधील रिंग उघडकीस आणल्या आहेत. पदाला न्याय देण्याचे काम केले आहे.

स्थायी समिती सदस्यपदासाठी मीनल यादव, रेखा दर्शिले, सचिन भोसले या तिघांचे इच्छुक असल्याबाबत माझ्याकडे पत्र आले होते. तीनही नावे मी संपर्कप्रमुखांना पाठविली होती. परंतु, सभेच्या दिवशी सव्वा दोन वाजेपर्यंत मला पक्षाकडून अंतिम नाव आले नव्हते. या तीनपैकीच एक नाव येईल, असे मला वाटले. माझ्याकडून पक्षशिस्तीचा भंग झाला आहे असे वाटत नाही.

पक्षाचा आदेश आल्यानंतर 24 फेब्रुवारीलाच मी पक्षाकडे राजीनामा पाठविला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना भवनातून आला. त्यानुसार आज मी राजीनामा दिला आहे. तसेच वेळ येईल तेव्हा त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असे सांगतानाच आपला कोणावर राग नसल्याचेही कलाटे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.