Pimpri News: वायसीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा जीविताचा विचार करून सामान्य, गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत राहिली. परिणामी एप्रिलमध्ये वायसीएम रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दैनंदिन ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. या काळात अत्यावश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर येथे उपचार करण्यात येत होते.

सद्यस्थितीतही रुग्णालयात काही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच शहराच्या बाहेरील रुग्ण ही वायसीएममध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात.

मागील वर्षी शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हा रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्याकाळात मार्च ते नाव्हेंबरपर्यंत ओपीडी बंद होती. नंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने 3 नोव्हेंबरपासून ओपीडी सुरू करण्यात आली. त्यानंतर दररोज जवळपास 800 ते 1000 रुग्णांची ओपीडीत तपासणी होत होती.

कोरोना विषाणुच्या दुस-या लाटेतील वाढता संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रामुख्याने सर्व शहरवासीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिकेचे विविध पातळ्यांवर प्रयत्न देखील सुरु आहेत.

त्या सर्व प्रयत्नांना ब-याच अंशी यश येऊन शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

तथापि, शहरातील सर्वसामान्य नागरिक तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांना सहज, सुलभ व आर्थिक दृष्टया परवडणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणेकामी महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे समजले जाणारे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सर्वसामान्य आजारांवरील वैद्यकीय उपचारांकरिता सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.