Pimpri News: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या कार्याचा वायसीएमएच रक्तपेढीतर्फे गौरव

एमपीसी न्यूज – जागतिक रक्तदाता दिनानिमित्त वायसीएमएच रक्तपेढीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गौरव समारंभामध्ये संत निरंकारी मिशनच्या योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. संत निरंकारी मिशनच्या वतीने अंगद जाधव यांनी या सन्मानाचा स्वीकार केला.

कोरोनाने भारतात शिरकाव केल्यापासून महामारीमुळे अनेक रुग्णांना रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत होती. या आपत्कालीन परिस्थितीची गरज लक्षात घेऊन आणि सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने आपले योगदान देत असतात. प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते. संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा कोरोना महामारी च्या काळात एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 23 रक्तदान शिबिर संपन्न झाली आहेत या मध्ये 2473 युनिट रक्त संकलन ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय. सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे वाय. सी. एम. रक्तपेढी मध्ये रक्तदान व प्लाझ्मादान करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना गेल्या दोन महिन्यांपासून मोफत जेवणाचा डबा देखील मिशनच्या तर्फे देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे पॅथॉलॉजी-विभाग प्रमुख डॉ. तुषार पाटील, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी, किशन गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.