Pimpri News: तरुणाला कोयत्याने मारहाण; पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी

फिर्यादी यांनी त्यांना 'आमच्या घरासमोर गोंधळ करू नका' असे सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आकाश यांना शिवीगाळ करून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.

एमपीसी न्यूज – घरासमोर गोंधळ करू नका म्हटल्यावरून एका तरुणाला पाच जणांनी मिळून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 18 जून आणि 19 जून रोजी चिंचवडमधील विद्यानगर येथे घडला. याबाबत 10 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश विजय जाधव (वय 18, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पवन लष्करे (वय 25, रा. रामनगर, चिंचवड), गणेश तोरसकर (वय 22, रा. मोरेवस्ती, चिखली), सिद्धार्थ चावरिया (वय मोरेवस्ती, चिखली), विकी राजपूत (वय 20, रा. रामनगर, चिंचवड), सुरज जाधव (वय 19, रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी रात्री साडेआठ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर गोंधळ घालत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना ‘आमच्या घरासमोर गोंधळ करू नका’ असे सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आकाश यांना शिवीगाळ करून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यात आकाश यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. आकाश रुग्णालयात उपचार घेऊन घरी आले. त्यानंतर 19 जून रोजी दुपारी चार वाजता आरोपी पवन लष्करे याने ‘आमच्या विरोधात तक्रार दिली, तर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सुरज जाधव याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.