Pimpri News: पिंपरीगाव-पिंपळे सौदागर समांतर पुलाचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर या गावांना जोडणाऱ्या पवना नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन समांतर पुलाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज, शनिवारी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर केशव घोळवे,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, नगरसेविका निर्मला कुटे आदी उपस्थित होते.

मागील नऊ-दहा वर्षांमध्ये पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, काटे पिंपळे या गावांमधील लोकवस्ती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनांच्या रहदारीमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे या गावांना जोडणारा जुना पूलही अपुरा पडत होता. तसेच पुलाची दुरवस्था होऊन पुलावर खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत होती.

तसेच या पुलावर संध्याकाळच्या वेळी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होऊन त्याचा मनस्ताप वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर पिंपरीतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी याठिकाणी समांतर पुल उभारण्याची मागणी केली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा करून या कामासंदर्भात तब्बल तीन वर्षे आयुक्त आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.

अखेर नगरसेवक वाघेरे यांच्या प्रयत्नांना यश आले.  त्यानुसार आज या पुलाचे भूमीपूजन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.