Pimpri corona News : कोविड सेंटरमधील सावळा गोंधळ (भाग एक) – रुग्णांच्या उपचारांबाबत माहिती मिळणे अवघड

कोविड सेंटर व्यवस्थापनाबाबत नाराजी ; सुविधांचा अभाव

0

एमपीसी न्यूज ( प्रमोद यादव ) – नेहरुनगर व ऑटोक्लस्टर कोविड सेंटरमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया रुग्ण व त्यांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत. सुविधांचा अभाव, रुग्णांच्या उपचार व प्रकृतीची माहिती न देणे, अस्वच्छता, चुकीच्या व्यक्तीचे मृतदेह सोपविणे, जेवण, रुग्णवाहिका तसेच, मृत रुग्णांचे साहित्य परत मिळविण्यात येत असलेल्या अडचणींबद्दल नातेवाईकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना जीव गमावलेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच बरे होऊन आलेल्या रुग्णांशी ‘एमपीसी न्यूज’ने संवाद साधला. नेहरू नगर कोविड सेंटरमधील आलेल्या अनुभव कथन करीत त्यांनी एकंदर व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली.

अमेय देशपांडे यांचे मामा हेमंत पुनतांबेकर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नेहरुनगर कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिथे आलेल्या अनुभवाबद्दल अमेय देशपांडे म्हणाले, ‘मामांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरवातीला ते नॉर्मल असल्याचे सांगितले तर, दुसऱ्या दिवशी ऑक्सिजनची गरज असल्याचे सांगितले. रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध नव्हते.

त्यानंतर इंजेक्शनसाठी आम्हाला वणवण करावी लागली. रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यावर मामांच्या परिस्थितीत सुधारणा झाली. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पाचव्या दिवशी अचानक रुग्ण दगावला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर झालेल्या उपचार व तब्येतीची काहीच माहिती आम्हाला दिली नाही असे, देशपांडे म्हणाले.

‘मामांच्या मृत्यूनंतर तेरा ते चौदा तासानंतरही त्यांचे शव आमच्या ताब्यात मिळाले नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने तुमच्या रुग्णाचे शव सापडत नसल्याचे सांगितले. त्यावेळी आम्हाला धक्का बसला. मी (अमेय देशपांडे) शवगारात गेलो. त्यानंतर त्यांनी शव सापडले, असे सांगितले पण ते उघडून बघितले असता दुसऱ्याच व्यक्तीचे शव आम्हाला दिल्याचे निष्पन्न झाले. थोड्या वेळाने मामांचे शव आम्हाला दिले.’

_MPC_DIR_MPU_II

‘त्यानंतर रुग्णवाहिकेची समस्या निर्माण झाली. नाईलाजास्तव खासगी रुग्णवाहिकेला अधिक पैसे देऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. विद्युतदाहिनीमध्ये सात -आठ तासांचे वेटींग होते. म्हणून अंत्यविधी सरणावर करायचे ठरले. सरणावरील अंत्यविधीचा सर्व खर्च पालिका देईल, असे महापालिकेचे आदेश असताना ठेकेदाराला सात हजार रुपये देऊन अंत्यविधी केला’, असे देशपांडे म्हणाले.

रुग्णालयात राहिलेलं साहित्य मिळवण्यासाठी आम्हाला धडपड करावी लागली. मोबाईल देण्यासाठी त्यांनी एक हजार रुपये घेतले, असे देशपांडे म्हणाले.

नेहरुनगर ऑटोक्लस्टर कोविड सेंटरमध्ये देखील अशाच समस्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. देहूजवळील किन्हई गावचे रहिवासी संदीप गोंटे यांचे वडील व चुलते ऑटोक्लस्टर व नेहरुनगर कोविड सेंटरमध्ये दाखल होते. त्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर गोंटे यांनी संपूर्ण रुग्णालय व्यवस्थापनावर शंका उपस्थित केली.

गोंटे म्हणाले, ‘माझे चुलते नेहरुनगर कोविड सेंटरमध्ये दाखल होते तर माझ्या वडीलांवर ऑटोक्लस्टर याठिकाणी उपचार सुरू होते. सात एप्रिल रोजी दाखल झाल्यानंतर सतरा एप्रिलपर्यंत दोघांवर उपचार कसे सुरू आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे की नाही, याबाबत कधीच माहिती दिली नाही. सतरा तारखेला अचानक तुमचे पेशंट मृत झाल्याचे सांगितले.’ हे कसं शक्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘रेमडेसिवीर, प्लाझ्मा या तर जुन्याच समस्या आहेत. कोविड रुग्णालय व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कोणतेही सहकार्य केले जात नसल्याचे गोंटे म्हणाले.

(क्रमशः)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment