Pimpri News : ब्रेन डेड महिलेच्या अवयदानामुळे पाच जणांना मिळाले नवजीवन

एमपीसीन्यूज : डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 55  वर्षीय महिलेला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयकांनी समुपदेशन केले. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन नेत्रपटल, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले. यामध्ये एक मूत्रपिंड आणि यकृत हे डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांचे प्रत्यारोपण पुण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आले.

अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.

“कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उप कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. नातेवाईकांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. अवयवदान हे एक पुण्यकर्म आहे. याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे आज दिसून येत आहे,’ असे मत डॉ. भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले.

या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, अशी भावना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी अवयवदात्याच्या नातेवाईकांचे आभार मानले. अवयवदान व प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु, अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.