Pimpri News : पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप; मूर्ती दान, कृत्रिम कुंडामध्ये विसर्जनावर भर  

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या सावटाखाली सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज (मंगळवारी, दि. 14) पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले जात असून, कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. 

पाच दिवसांच्या घरगुती गणपतीला आज निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने प्रभागानुसार 107 ठिकाणी व्यवस्था केली आहे. तसेच, ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि नगरसेवकांनी कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. निर्माल्य संकलन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये संस्कार प्रतिष्ठान व पालिकेच्या वतीने घाटावर निर्माल्य संकलन करण्यासाठी मोठी कुंडी ठेवण्यात आली असून, गणेश मूर्तीची पूजा करून मूर्ती जमा करून घेतली जात आहे. संकलित केलेल्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नदी घाटावर गणपती विसर्जन करण्यासाठी बंदी असल्यामुळे घाटावर शुकशुकाट पाहायला मिळाला. विसर्जन करण्यास आलेल्या गणेश भक्तांना गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून याठिकाणी शिस्तबद्ध विसर्जन होत आहे. गणेश विसर्जनाच्या ठिकाणी महानगरपालिका व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरातून जमा केलेल्या गणेश मूर्तीचे वाकड येथील विनोदे वस्तीच्या तळ्यात विधिवत विसर्जन केले जाणार जाते. यासाठी वेगळी टिम नेमण्यात आली आहे, असे संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी सांगितले.

गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान मार्फत शहरात ठिकठिकाणी चार गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोसायटी तसेच काॅलनीमधील गणेश भक्त विसर्जनासाठी गाडी बोलावून घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. या साठी ठिक ठिकाणाहून संपर्क करून भाविक मूर्ती दान करत आहेत, असे गायकवाड म्हणाले.

जवळपास वीस महिन्यांपासून जगावर कोरोना संकटाचे सावट आहे. लस उपलब्ध झाली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने आले आहेत. त्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे व विसर्जन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. गणेश भक्तांकडून देखील याचे पालन केले जात आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.