Pimpri news : ‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांसाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शनचा तातडीने पुरवठा करा : लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरीसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडले असून ते रुग्णांच्या जिवावर बेतणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिंपरी-चिंचवडसाठी तातडीने ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोनाच्या संकटानंतर आता नागरिकांना म्युकरमायकोसिस आजार होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत या बुरशीजन्य आजाराचे 64 रुग्ण दाखल आहेत. त्यांपैकी 23 रुग्णांवर उपचार सुरू असून, गंभीर बाब म्हणजे या आजाराने 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजमितीला 31 रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन व इतर औषधांची आवश्यकता आहे. परंतु, या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरीत होत आहे. आपल्या कार्यालयामार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन उपलब्ध केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

याआधीही कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी नाहक त्रास सहन करावा लागला आहे. हे इंजेक्शन मिळाले नाही म्हणून काही रुग्ण दगावले गेले हे नाकारता येणार नाही. आता पुन्हा म्युकरमायकोसिसबाबत तशीच परिस्थिती पुन्हा उभी राहते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत भर पडल्याने या रुग्णांना वेळेत उपचार देण्यासाठी ॲम्फोटेरीसीन-बी या इंजेक्शनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे समीकरण बिघडले आहे. त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने दखल घ्यावी.

म्युकरमायकोसीस आजाराचा वाढत्या संसर्गाची गांभीर्याने दखल घेऊन वायसीएम हॉस्पिटल व इतर सर्व खाजगी कोविड रुग्णालयांतील रुग्णांना ॲम्फोटेरीसीन-बी या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.