Pimpri News: ‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांनी जलपर्णीची पाहणी करुन अहवाल सादर करावा – अजित पवार

जलपर्णी काढण्यासाठी नियोजन करण्याचे महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील नद्यांमधील जलपर्णी काढणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील मुळा, मुठा, भीमा या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

मुळा-मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

_MPC_DIR_MPU_II

बैठकीला आमदार राहुल कुल, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जिल्ह्यातील नद्यांमधील जलपर्णी काढणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा. पुणे महापालिकेने पाषाण तलाव, कात्रज तलाव, जांभुळवाडी तलावातील जलपर्णी व गाळ काढून तलावाची स्वच्छता करुन घ्यावी.

तसेच नद्यांच्या पात्रांमधील जलपर्णी काढण्यासाठी पुणे, पिंपरी -चिंचवड महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.