Pimpri News: फुलबाजारात गुडघाभर पाणी, वीसच दिवसांपूर्वी झाले होते बाजाराचे स्थलांतर

एमपीसी न्यूज – गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी शगुन चौक येथील फुलबाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत बाजारात जावे लागत आहे.

तब्बल 15 वर्षानंतर पिंपरी-चिंचवड शहरात फुल बाजारासाठी स्वतंत्र जागा पालिकेने उपलब्ध करून दिली. मात्र, कामातील फोलपणा आठवड्याभराच्या पावसाने उघड केला आहे. दरम्यान, केवळ वीसच दिवसांपूर्वी नवीन फुल मार्केटची जागा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या फुलांच्या मागणीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. मात्र, फुल बाजारास आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याने शगुन चौकातील जागा अपुरी पडत होती. त्यामुळे त्याठिकाणी व्यापार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

याशिवाय वाहतुकीची समस्यादेखील भेडसावत होती. जागेअभावी गेल्या 15 वर्षांपासून फुल बाजार पहाटे सहा ते नऊ या वेळेत पिंपरीतील शगुन चौकात भरत होता.

जागेअभावी आणि वेळेअभावी वाढत्या फुल उत्पादनामुळे शेतक-यांना त्यांचा शेतीमाल पर्यायाने कमी भावाने विकावा लागतो. त्यामध्ये बरेच आर्थिक नुकसान होत असे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 2017 पासून वेळोवेळी महापालिकेकडे कायमस्वरूपी जागेची मागणी होत आहे. त्यास अनुसरून महापालिका भूमी-जिंदगी विभागाने पिंपरीतील क्रोमा शोरूम शेजारील जागेची पाहणी केली.

त्यांनतर पालिकेने क्रोमा शेजारील जागा फुलबाजाराला भाड्याने देण्याचे मान्य केले होते. अखेर 1 ऑगस्ट 2020 रोजी फुलबाजाराचे स्थलांतर करण्यात आले. मात्र कामातील फोलपणा नुकताच समोर आला.

या फुलबाजारात गेल्या चार दिवसांपासून गुडघाभर पाणी साचले आहे. त्यातून वाट काढत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना ये-जा करावी लागते. पाणी बाहेर जाण्यास व्यवस्थित ‘आउट लाईन ‘ नसल्याने हि समस्या उदभवली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या ‘ह’ प्रभागाचे कार्यकारी अभियंता अनिल राऊत म्हणाले, ”गेल्या आठवडाभर पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी पिंपरी फुलबाजारात पाणी साचत आहे. याबाबत तातडीने बाजाराची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर तातडीने उपाय योजना केल्या जातील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.