Pimpri News : महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करा – मराठा सेवा संघ

एमपीसी न्यूज – अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांची बदनामी व चारित्र्य हनन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा. अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा सेवा संघ, पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.

रानवडे यांनी पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल बदनामी कारक लिखाण केल्याप्रकरणी नाशिक येथे लोकसत्ताचे संपादक पत्रकार व लेखक गिरीश कुबेर यांच्या अंगावर शाई फेकली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांची बदनामी व चारित्र्य हनन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा. असे साहित्य प्रकाशित करून पोट भरणाऱ्यांना जरब बसावी’

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यातेच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या सारख्या थोर पुरुषांची बदनामी व अपमान करणाऱ्या लोकांची गय करता कामा नये. अशा लोकांना आमच्या वतीने चोख उत्तर दिले जाईल. थोर पुरुषांचे चरित्र्य हनन, बदनामी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही.’ असे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.