Pimpri News : ‘के-विले’वर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे आंदोलन; आयुक्तांकडून कारवाईचे आश्वासन

एमपीसीन्यूज : बांधकाम प्रकल्पावरील मजुरांना सुरक्षा साधने पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याने एका मजुराचा नाहक बळी गेला. मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘के-विले’ या बांधकाम प्रकल्पाच्या संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज, बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिका हद्दीतील किवळे, आदर्शनगर येथे युनिक चिंतामणी डेव्हलपमेंट या कंपनीचा के-विले या नावाने बांधकाम प्रकल्प सुरु आहे. तिथे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा विषयक साधने पुरविली नसल्याने 14 फेब्रुवारीला तपस रायपद मंडल (वय-31 रा. कलकत्ता) या बांधकाम मजुराचा काम सुरु असताना डकमध्ये पडून मृत्यू झाला.

त्यामुळे मनसेने या प्रकल्पाच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह प्रकल्पाचे बांधकाम बंद करण्याची मागणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे केली होती. मात्र, अद्याप या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मनसेने आज, बुधवारी महापालिका आवारात आंदोलन केले.

दरम्यान, मनसेचे सचिन भांडवलकर, मोझेस दास, संजय शिंदे,  किरण गवळी, अविनाश लोखंडे,अनिल वरगडे व मनिषा पवार आदींच्या शिष्टमंडळाने बांधकाम विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम व कनिष्ठ अभियंता मनाली स्वामी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन देण्यात आले. के-विले या साइटच्या संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व काम बंद करण्याचे आदेश असूनही काम सुरू असल्यामुळे कायदेशीर कारवाई करुन दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

त्यावर आयुक्त पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच पुन्हा बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क करा, तात्काळ कारवाई करू, असे आश्वासनही आयुक्तांनी दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित केल्याची माहिती मोझेस दास यांनी दिली.

यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वरगडे, अविनाश लोखंड, मावळ तालुका अध्यक्ष (ग्रामीण) आलतमेश सय्यद, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास यांच्यासह सचिन बिराजदार, मलिक शेख, संदीप पोटफोडे, मनिषा पवार, कृपाली गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.