Pimpri News : महापालिकेने शहरातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी – प्रशांत शितोळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाला महापालिकेच्या खर्चातून लस द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी केली. अन्यथा नागरिकांच्या जीवासाठी खर्च करण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत म्हणून महापालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शितोळे यांनी म्हटले आहे की, भारत सरकार व महाराष्ट्र शासन तसेच देशातील अन्य राज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकार दुजाभाव करीत आहे. ज्यावेळी लस शोधण्यात विविध संस्थांना यश आले. त्यावेळी मात्र केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत लस देण्यात येईल, असे जाहीर केले होते. तथापि गेल्या आठवड्यापासून भारत सरकार व विविध राज्य शासन यांनी लसी खरेदी करणे बाबत गोंधळ दिसून आहे.

महापालिकेचे नाव आशिया खंडात श्रीमंतीच्या बाबतीत नावाजलेले आहे आणि आजही महानगरपालिकेकडे मुबलक पैसे आहेत. नुकताच महानगरपालिकेचा जवळपास सात हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजुर झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये कोरोना सारख्या महामारीसाठी महापालिकेने आजपर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलेला नाही आणि तो नागरिकांच्या जीवासाठी अर्थसंकल्पाच्या दहा टक्के सुद्धा नाही.

गेल्या 4 वर्षात तर मोठ्या प्रकल्पांचे आकडे पाहिले तर सर्वसामान्यांना त्या आकड्यातील कोटींचे शून्य किती आहेत हे मोजता सुद्धा येणार नाहीत. आता मात्र त्याच सर्वसामान्यांच्या जीवावर आलेली वेळ आहे. त्यामुळे याच श्रीमंत महानगरपालिकेने शहरातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत केले पाहिजे, असे शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.