corona vaccination News: महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-19 लसीकरणाला महापालिकेच्या वतीने आजपासून सुरुवात झाली. शहरातील इतर 11 खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे . मात्र, त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल.

लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ महापालिकेच्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामधून करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता तिरुमणी, डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ. करुणा साबळे आदी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार साठ वर्षे वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोविड 19 लस दिली जाणार आहे. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वय वर्षे 45 ते 60 या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींनाही कोविड 19 ची लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आठ कोविड 19 लसीकरण केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

यामध्ये पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय चिंचवड, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, यमुनानगर रुग्णालय आणि ईएसआय रुग्णालय चिंचवड यांचा समावेश आहे. या आठ ठिकाणी ही लस मोफत दिली जाणार आहे. शहरातील इतर 11 खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे मात्र, त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल.

ज्येष्ठ नागरिकांनी कोविड 19 चे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी यावेळी केले. लसीकरणाच्या ठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करु नये. तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.