Pimpri news: महापालिका सोमवारपासून भटकी डुकरे पकडण्याची मोहीम राबविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात उपद्रव करणारे, तसेच आरोग्यास हानिकारक डुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डुकरे पकडणे आणि त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवार (दि.12) डुकरे पकडण्याची मोहीम राबविणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.

शहराच्या विविध भागात डुकरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डुकरांचा नागरिकांना त्रास होत आहे. शहरात उपद्रव करणारे, सार्वजनिक आरोग्यास हानिकारक भटकी, मोकाट डुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या नगरसेवक, नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिकेकडे येत आहेत.

ही डुकरे पकडणे, त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

त्यासाठी सोमवारपासून डुकरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. भटकी डुकरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. परवानाधारक डुकरे मालकांनी त्यांची डुकरे बंदिस्त ठेवावीत. बाहेर भटकणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

दरम्यान, पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत दहा महिन्यांपूर्वी शहरातील उपद्रवकारक भटकी, मोकाट डुकरे अटकाव करणे व त्यांची शहराबाहेर लावण्याची मोहीम 10 दिवस राबविली होती.

यामध्ये 600 पेक्षा जास्त डुकरांना शहराच्या विविध भागांमधून पकडण्यात आले होते. आता पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी शहरातील मोकाट डुकरांचा मुद्दा उपस्थित करीत महापालिका आयुक्तांकडे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तसेच आयुक्तांच्या कार्यालयासह बंगल्यात डुकरे सोडण्याचा इशारा दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.