Pimpri News : ठरलं… महापालिकेचा लसीकरणाचा आराखडा तयार; पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार लस

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना लसीच्या चाचण्या झाल्यानंतर लस मंजुरीच्या टप्प्यात आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व पातळ्यांवर लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील हे नियोजन केले असून राष्ट्रीय पातळीवर घोषणा केल्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.

कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी कोरोना लस निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील सर्व शासकीय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय, मनपा आणि खाजगी आस्थापना आरोग्य वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

पालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी 73, पी एच एन 8, स्टाफनर्स 21, ए एन एम 136, आशा स्वयंसेविका 148 एवढे मनुष्यबळ उपलब्ध आहे. शहरात कोरोना लसीसाठी 32 शितसाखळी केंद्रे आहेत. त्यात 2 हजार 695 लिटर क्षमतेची जागा उपलब्ध आहे.

कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रशिक्षण सोमवारी (दि. 14) आणि मंगळवारी (दि. 15) झाले. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि पी एच एन यांचे प्रशिक्षण बुधवारी (दि. 16) आणि गुरुवारी (दि. 17) होणार आहे. पालिकेच्या इतर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण त्यानंतर होणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना लस पहिल्या टप्प्यात शासकीय, मनपा व खाजगी आस्थापनेवरील आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी पालिकेच्या स्मार्ट सारथी या ॲप्लिकेशनवर नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.