Pimpri news: ‘रेमडेसीवीर’च नव्हे ‘प्लाझा’ थेरपीनेही कोरोनाचे गंभीर रुग्ण होताहेत ठणठणीत – डॉ. विनायक पाटील

प्लाझा दानाबाबत महिलांमध्ये संभ्रम; जनजागृतीची आवश्यकता

एमपीसी न्यूज – कोरोनाचे गंभीर रुग्ण केवळ रेमडेसीवीर इंजेक्शननेच नव्हे तर ‘प्लाझा’ थेरपीनेही बरे होत आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांनी तीन रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी केली. रेमडेसीवीर न देता आणि ऑक्सिजन लेवल 60 असताना प्लाझ्मा थेरपीतून रुग्ण ठणठणीत करून घरी पाठविले आहेत. रेमडेसीवीर न देता प्लाझ्मा थेरपी करून गंभीर रुग्ण बरे केले आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा जीवदान देत असल्याचे सांगत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील यांनी केले आहे.

डॉ. पाटील म्हणाले, प्लाझ्मासाठी दोन आठवड्यात 408 डोनर उपलब्धता झाले होते. 50 टक्के प्लाझ्मा महापालिका रुग्णालयातील रुग्णांसाठी आणि 50 टक्के खासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी दिला जातो. दररोज 35 ते 40 लोकांची प्लाझ्मासाठी मागणी असते. सर्वांना प्लाझ्मा देणे अशक्य होते. डोनर उपलब्ध नसल्याने 15 ते 20 लोकांना परत जावे लागते.

खासगी रुग्णालयांना सहा हजार रुपयांना प्लाझ्मा दिला जातो. त्यातील 2100 रुपये दात्याला दिले जातात. कोरोनातून बऱ्या झालेल्या महिला रुग्णांमध्ये प्लाझ्मादानाबाबत गैरसमज आहेत. पुरुष रुग्ण मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करतात. त्यातुलनेत महिलांची संख्या खूप कमी आहे. 100 पुरुषांच्या मागे एक महिला प्लाझ्मादान करत आहे. कोरोनातून बरे झाल्याच्या 28 दिवसानंतर ज्यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यांनी बाधित रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करणे अतिशय गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील, राज्याच्या विविध भागांतील आणि परराज्यातील रुग्ण वायसीएममधून प्लाझ्मा घेऊन जात आहेत. त्या भागातही प्लाझ्मा उपलब्ध करणे गरजेचे आहे. जेणेकरून वायसीएम रक्तपेढीवरील ताण कमी होईल. इतर ठिकाणी रक्तपेढीचे सेंटर उभे राहिले पाहिजेत. वायसीएमकडे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी परावृत्त करण्याकरिता मेडिकल सोशल वर्करची आवश्यकता आहे.

प्लाझ्मा थेरपी 1918 मध्ये पॅनिश फ्ल्यूसाठी वापरली होती. प्लाझ्मा थेरपी रोगप्रतिकारक शक्तीच्या कोशिका यांच्या नॅचरल किलर टी सेल या रोगप्रतिकारक शक्तीमधून उपलब्ध होतात. कोरोना विषाणूवर घाव घालून व्हायरल रॅप्लीकेशन कमी करतात. त्यामुळे रक्त वाहिन्यातील कोरोना विषाणूची संख्या कमी होते.

तसेच न्यूट्रलायजिंग अँटीबॉडीज त्या रुग्णांना पॅसिव्ह म्हणून प्रभावी असतात. त्यामुळे या रुग्णांना कोरोना होण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थानी प्लाझ्मा दानाबाबत कॅम्प घेणे आवश्यक आहे. तसेच जनजागृती केली पाहिजे. प्लाझ्मादान करताना लोकांना अशक्तपणा जाणवतो.

रक्तदान जसे श्रेष्ठदान आहे तसेच प्लाझ्मा हा कोरोना रुग्णांसाठी जीवदान आहे. 65 वर्षाखालील सर्व पोस्ट कोविड रुग्ण प्लाझ्मादान करू शकतात. प्लाझ्मा देऊन कोरोना रुग्णांचा जीव वाचवाववा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

प्लाझ्माचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे – संदीप वाघेरे

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना प्लाझ्मा वरदान ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीने अनेक रुग्ण ठणठणीत झाले आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शनचा जसा काळाबाजार सुरू आहे, तसा प्लाझ्माचा होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे. प्लाझ्माही धोक्यात आलेला आहे. त्याचाही काळाबाजार होणार असेल तर प्रशासनाने लक्ष ठेवावे. धडक कारवाई करावी. त्यासाठी एक टीम तयार करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

तसेच वायसीएममध्ये तातडीने चार ब्लड टेक्निशियन, एक एमबीबीएस डॉक्टर, डेटा ऑपरेटर, एमएसडब्ल्यू यांची गरज आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.