Pimpri News: महापालिकेच्या 118 थकबाकीदारांना नोटिसा; मालमत्ता जप्तीचा आयुक्तांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील 118 बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून, पुढील आठवड्यात कारवाईची व्याप्ती वाढविली जाणार आहे. अंतिम नोटीशीद्वारे थकबाकी अदा न केल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

आतापर्यंत 495 कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. 31 मार्चपर्यंत 375 कोटींची रक्कम करदात्यांकडे थकीत आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून यापुढे थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची धडक कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच क्षेत्रीय कार्यालय आणि विभागीय कार्यालयाचा दर्शनी भागात लावण्यात आली आहेत.

मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी संपूर्ण थकबाकीसह बिलाची रक्कम भरावी आणि 75 टक्के विलंब शुल्कात सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

आतापर्यंत 7 हजार 401 मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला असून 88 कोटी 49 लाखांचा भरणा केला आहे. महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर आकारणी आणि कर संकलन विभागाने थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

अंदाजपत्रकीय उद्दीष्टापेक्षा 375 कोटी रुपयांनी मालमत्ताकर कमी वसूल झाल्याने महापालिकेकडून मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. ही कारवाई मार्च महिन्यानंतरही सातत्याने सुरु राहणार आहे.

नागरिकांना सर्व करसंकलन विभागीय कर्यालयात साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.