Pimpri News: 84 दिवस पूर्ण झालेल्या 1 लाख 99 हजार नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घ्यावा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या नवीन ‘ओमायक्रॉन’ विषाणू विरोधातील लढाईसाठी कोरोना प्रतिबंधक लस सर्वात मोठी सुरक्षा आहे. शहरातील 1 लाख 99 हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत. हे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असून त्यांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले. महापालिकेकडे लशींची मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचेही वैद्यकीय विभागाने सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लशीचे 26 लाख 86 हजारांहून अधिक डोस महापालिकेने दिले आहेत. त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 88 टक्के असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 64 टक्के आहे. काही नागरिकांनी पुण्यात जाऊन लस घेतली. ती संख्या समाविष्ट केल्यास दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाणही 70 टक्के होईल. 18 ते 45 वयोगटातील 100 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 70 ट्कके जणांनी दुसराही डोस घेतला.

45 ते 60 या वयोगटातील 72 टक्के नागरिकांनी पहिला तर 56 टक्के नागरिकांनी दुसराही डोस घेतला. 60 वर्षापुढील 60 टक्के पहिला तर 52 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 लाख 57 हजार 513 अशा 88 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 11 लाख 29 हजार 339 अशा 64 टक्के नागरिकांनी दुसराही डोस घेतला आहे. शहरातील 26 लाख 86 हजार 852 नागरिकांनी लस घेतल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. शहरातील 1 लाख 99 हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत. हे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असून त्यांनी दुसरा डोस लवकर घ्यावा. महापालिकेकडे लशींची मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना विरुद्ध लढ्यासाठी नागरिकांची प्रतिकारशक्ती महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरात 16 जानेवारपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला फ्रंट लाइन वर्कर व आरोग्य-वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व लशीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनंतर 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याचे उद्दिष्ट होते.

सध्या अठरा वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांना प्राधान्य आहे. परदेशात जाणारे विद्यार्थी व नागरिकांसाठी काही डोस राखीव ठेवले आहेत. तसेच, गर्भवती व स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव असतात. त्यांच्यासाठी महपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील आठ केंद्रांवर दैनंदिन स्वरूपात लसीकरणाची व्यवस्था केली आहे.

तीन प्रकारची लस
महापालिकेच्या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. तर, खासगी केंद्रांवर या दोन्ही लशींसह स्फुटनिक व्ही लसही उपलब्ध आहे. मात्र, महापालिकेतर्फे मोफत लस दिली जात असून खासगी केंद्रांवर शुल्क आकारणी केली जात आहे. शहरातील काही नागरिकांनी शहराबाहेरील आणि शहराबाहेरील काही नागरिकांनी शहरातील केंद्रावर लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.