Pimpri news: पालिका विषय समित्यांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारची परवानगी

प्रभाग समिती अध्यक्ष, विषय समित्यांची होणार निवडणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बरखास्त झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.

त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल. तर, प्रभाग समिती बरखास्त होत नसल्याने अघोषित मुदतवाढ मिळालेल्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांचीही निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी हे पद मिळावे, यासाठी आतापासूनच नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करू नयेत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.  पालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि  कला, क्रीडा, सांस्कृतीक चार विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ 14 जून 2020 रोजी संपल्याने समित्या बरखास्त  झाल्या होत्या. त्यांनतर कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण समिती देखील बरखास्त झाली होती.

या समित्यांचे अधिकार महासभेकडे गेले होते. आता निवडणूक घेण्यास राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज होणार आहे. त्याची विषयपत्रिका तयार झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल.

महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा  कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांचीही निवडणूक होणार आहे. दरम्यान, मागील साडेतीन वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी आता हे पद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”विषय समित्या बरखास्त झाल्याने विविध विकासकामाचे निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. निवडणूक घेणे आवश्यक होते. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. विषय समित्यांची निवडणूक घेण्याची विनंती केली. त्यानुसार राज्य सरकारने विषय समितीचे निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. लवकरच सदस्य निवडून सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येईल”.
याबाबत बोलताना पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”राज्य सरकारने विषय समिती, प्रभाग समितीच्या निवडणुका घेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन होणाऱ्या सभेत निवडणूक घेण्यात येईल. विषय समितीचे सदस्यांची निवड ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत केली जाईल. त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक होईल. तर, आठही प्रभाग समितीच्या अध्यक्षांची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन केले जात आहे. विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले जाईल. त्यांची परवानगी, निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रभाग अध्यक्षांची निवडणूक घेण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.