Pimpri News: रस्ते सफाईच्या निविदेत सत्ताधारी, प्रशासनाच्या संगनमताने मोठा ‘झोल’ – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते सफाईच्या निविदेत सत्ताधारी व प्रशासनाच्या संगनमताने मोठा ‘झोल’ झाल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या चुकीमुळे मुदतवाढीचा खेळ सुरू असून या संपूर्ण निविदाप्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते साफसफाईच्या कामात मागील काही वर्षांपासून मुदतवाढीचा खेळ सुरू आहे. या कामांसाठी नव्याने केलेल्या निविदाप्रक्रियेबाबत सत्ताधारी भाजप आणि महानगरपालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय संशयास्पद आहेत.

या निविदाप्रक्रियेत काही मंडळींना वाचविण्यासाठी सत्ताधारी आणि संबंधित अधिका-यांनी अचानक निविदा प्रक्रिया रद्द करून मोठा झोल केल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे या निविदाप्रक्रियेत कोणी सहभागी झाले होते आणि अधिकारी कोणाला वाचवत आहेत, याची उत्तरे मिळण्यासाठी सविस्तर चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.