Pimpri News: कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा; काही लसीकरण केंद्रे बंद

उद्याही कमीच लसीकरण होण्याची शक्यता : लसीच्या साठ्याबाबत माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा आहे. लसीचे डोस संपल्याने काही लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. अनेक सेंटरवरून नागरिकांना लसीकरण न करताच परत जावे लागले. उद्याही ( शुक्रवारी) लसीकरण कमीच होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

महापालिकेडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे लसीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, किती सेंटर बंद झाले, लसीचा साठा किती आहे, याची माहिती देण्यास वैद्यकीय विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे.

महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांबरोच लसीकरणवरही भर दिला आहे. महापालिकेची 58 आणि खासगी 29 अशी 87 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. या 87 लसीकरण केंद्रावर शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाते. दिवसाला 15 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

महापालिकेला लसीचा पुरवठा कमी होत आहे. महापालिकेकडे केवळ 15 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक होते. अनेक केंद्रावरील लसीचे डोस दुपारीच संपले. त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. लसीकरण थांबवावे लागले. नागरिकांना लस न घेताच परत जावे लागले.

खासगी लसीकरण केंद्रावरही लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, दुसऱ्या डोससाठीचे भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’चे काही डोस शिल्लक आहेत. पण, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या ‘कोव्हिशील्ड’च्या लसीची मोठी कमतरता आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, “लस कमी आल्या आहेत. आज आठ हजार लस मिळाल्या. जेवढ्या लस आहेत त्याचे लसीकरण केले जात आहे. लस मिळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. राज्य सरकारकडूनही लस मागविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याला केंद्राकडून लस कमी आल्या आहेत असे कळाले आहे. जास्तीत जास्त लस मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आणि उद्या थोडे कमी लसीकरण होईल. पण, जे आहे ते व्यवस्थित होत आहे. जेवढ्या लस दिल्यात त्या संपल्यानंतर तात्पुरते लसीकरण थांबले आहे. तिथे दुसऱ्या दिवशी लसीकरण होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.