Pimpri News: पिंपळेनिलख येथे श्रीराम प्रेरणा स्मारक, आकुर्डीत वारकरी भवन, तळवडेत वारकरी विसावा केंद्र उभारणार

अंदाजपत्रकात नवीन कामांचा समावेश; 152 कोटींच्या उपसूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सर्वपक्षीय नगरसेवकांनी 151 कोटी 50 लाख रुपयांच्या उपसूचना दिल्या आहेत. या उपसूचना ग्राह्य, अग्राह्य निश्चित करुन उद्या (बुधवारी) होणा-या सभेत अंदाजपत्रकाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

पिंपळेनिलख येथे श्रीराम प्रेरणा स्मारक, आकुर्डीत वारकरी भवन, तळवडेत वारक-यांकरिता विसावा केंद्र उभारणे, पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी पर्यंतचा रस्ता विकसित करणे, वाकड येथे रोटरी ग्रेडसेपरेटर उभारणे, पोलीस उपायुक्त कार्यालय, पिंपळेगुरवच्या माध्यमिक शाळेत स्मार्ट सिटी इनोव्हेशन सेंटर तयार करणे, अशी नवीन कामे अंदाजपत्रकात सूचित केली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2021-22 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 588 कोटी 78 लाख, तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 7 हजार 112 कोटी 1 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी 18 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला होता. त्याला स्थायी समितीने 250 कोटी रुपयांच्या उपसूचना देत 24 फेब्रुवारी रोजी मान्यता देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली होती.

तब्बल महिन्याभरानंतर अंदापत्रकावरील चर्चेसाठीची विशेष सभा 26 मार्च रोजी पार पडली. दुपारी दोन वाजता सुरु झालेली सभा रात्री 11 वाजपर्यंत सुरु होती. चर्चेअंती सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपसूचना घेण्यात आला.

भाजपचे केशव घोळवे आणि सागर आंगोळकर यांनी अंदाजपत्रकात नवीन विकास कामांचा समावेश करणे, सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, कामांच्या तरतुदीमध्ये वाढ/ घट करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला एकमताने मान्यता दिली. त्यानंतर तहकूब केलेली विशेष सभा उद्या होणार आहे. त्यात उपसूचना ग्राह्य, अग्राह्य करुन अंदाजपत्रकाला मान्यता दिली जाणार आहे.

अंदाजपत्रकात पिंपळेनिलख बाणेर पुलाजवळील उद्यानात श्रीराम प्रेरणा स्मारक उभारणे, आकुर्डीत वारकरी भवन, तळवडेत देहू-आळंदी रस्त्यालगत अध्यात्मिक समूहशिल्प आणि वारक-यांकरिता विसावा केंद्र उभारणे, पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रिट डिझाईननुसार विकसित करणे, वाकड येथे रोटरी ग्रेडसेपरेटर उभारणे, पोलीस उपायुक्त कार्यालय, पिंपळेगुरवच्या माध्यमिक शाळेत स्मार्ट सिटी इनोव्हेशन सेंटर तयार करणे अशी नवीन कामे सूचित केली आहेत.

याखेरीज उद्यान, रस्ते विकसित करणे, डांबरीकरण, रस्ते काँक्रीटीकरण, सुशोभीकरण, मलनि:सारण वाहिन्या टाकणे आदी कामांचाही समावेश आहे.

महापालिका नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, डांगे चौकात ग्रेडसेपरेटर बांधणे, पवना नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक कामे करणे, भोसरी सहल केंद्रात मत्स्यालय, लेझर शो करणे, गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करणे, भोसरीत स्केटिंग मैदान विकसित करणे, बो-हाडेवातील आरक्षित जागेवर शाळा इमारत बांधणे या कामांच्या अंदाजपत्रकीय तरतुदीत वाढ सुचविण्यात आली आहे.

महापौर विकास निधीत 13 कोटींनी घसघशीत वाढ करताना विमा निधीत कपात केली आहे. ठेकेदारी पद्धतीने काळजीवाहक नेमण्याच्या कामासाठी दोन कोटी रुपयांची वाढ केली असून क्रीडा विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनांच्या निधीत कपात केली आहे.

तर, महापालिका हद्दीतील झोपडपट्टीमध्ये वास्तव्य असलेल्या महिलांसाठी चादर, कंबल, पंजा आणि बेडशीट व संसारोपयोगी साहित्य वाटणे यासाठी 16 कोटी 80 लाख रुपयांची वाढ सूचविली आहे.

त्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण व उपक्रम राबविणे, महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणे, एचसीएमटीआरच्या राखीव जागा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी डीएसआरसीच्या सल्ल्यानुसार बीआरटी, मोनोरेल, ट्राम विकसित करणे, तळवडेतील शिववेरील रस्ता, सार्वजनिक सुरक्षितता, विद्युत विषय कामे, च-होलीतील 30 मीटरचा रस्ता, मोशीतील रस्ते अद्यावत पद्धतीने विकसित करणे या कामाच्या तरतुदीत घट करण्याचे सुचविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.