Pimpri news: स्पर्श, ‘गॅब’वरून नगरसेवक आक्रमक, स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करणार; आयुक्तांचा खुलासा

एमपीसी न्यूज – स्पर्श हॉस्पिटलच्या भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्समधील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसताना चुकीच्या पद्धतीने तीन कोटी रुपये अदा केले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच गॅस पुरवठा करणाऱ्या कामकाजात अनियमितता आहे. विनानिविदा गॅब ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप करत या दोनही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

त्यावर भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. या दोनही प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेद्वारे सखोल केली जाईल. त्यातील तथ्य सभागृहासमोर मांडेल, असा खुलासा आयुक्त राजेश पाटील यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी वायसीएम रुग्णालयाकरिता दररोज किती ऑक्सिजन वापरला जातो? निविदेतील ऑक्सिजन खरेदी दर काय? व प्रत्यक्ष खरेदी दर काय? किती वर्षांसाठी ठेका दिला? पुन्हा निविदा काढली का? न काढण्याची कारणे काय? ऑक्सिजन गाडी तपासणा-या अधिका-याची शैक्षणिक पात्रता काय? ऑक्सिजन वापराचे रेकॉर्ड कसे ठेवले जाते? असे प्रश्न विचारले होते.

वायसीएमचा ऑक्सिजन पुरवठा, कोरोना काळात झालेले मृत्यू, वैद्यकीय विषयक खरेदी यावर तब्बल पाच तास चर्चा झाली. भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीवर तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर आरोप केले.

खुलासा करताना वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, वायसीएमएचमध्ये पूर्वी 26 क्युबिक लिटर ऑक्सिजन लागायचा. आता दररोज 30 क्युबिक लिटर ऑक्सिजन लागतो. सरकारकडून करवाढ, कामगार पगार वाढ, ऑक्सिजन दरवाढ व यंत्रणा देखभाल खर्च वाढल्याने दर वाढवून दिला आहे. ऑक्सिजन पुरवठादाराशी करार केलेला असून त्याची मुदत 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यावेळी 450 पेक्षा अधिक रुग्ण होते. मृत्यू मात्र नऊ झाले आहेत.

ऑक्सिजन कमतरता भासू नये म्हणून 20 क्युबिक लिटर क्षमतेची टाकी उभारली आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजन पुरवठा केला आहे. वायसीएमएचमध्ये 21 हजारांवर रुग्ण होते. वायसीएमसह महापालिका रुग्णालयांत 16 हजार 500 रुग्ण होते. त्यातील 850 जणांचा मृत्यू झाला आहे. आयसीयू व्यतिरिक्त जनरल वॉर्डातील 610 पैकी 574 बेडला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. जनरल वॉर्डात 15 लिटर प्रतिमिनिट व आयसीयूमध्ये 60 प्रतिलिटर क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा केला जातो.

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करणार – आयुक्त पाटील

त्यानंतर स्पर्शच्या बिलांवर खुलासा करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोरोना काळात झालेल्या मृत्यूंबाबत मलाही वेदना होत आहेत. निविदा प्रक्रिया, त्यातील गैरव्यवहार बंद करणार आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. चुकीच्या गोष्टी घडल्या असल्यास खोलापर्यंत जाईल. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही.

ऑक्सिजन पुरवठादार, स्पर्श हॉस्पिटलची स्वतंत्र यंत्रणेद्वारे कमी वेळात चौकशी केली जाईल. लोकभावनांना जागणे व विश्वासार्हता जपण्याला महत्त्व देणार आहे. कोविड केअर सेंटरच्या बिलांबाबत चौकशी केली जाईल. भोसरी नवीन व पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात आयसीयू सुरू करण्याचा विचार आहे. पोळी भाजून घेणा-या प्रशासनातील कोणाचीही गय केली जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.