Pimpri news: बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना सुरू करावी; भाजप कामगार आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील बांधकाम कामगारांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा गंभीर प्रश्न झाला आहे. कामगारांसाठी पूर्वी असणारी (मेडिक्लेम) आरोग्य योजना तात्काळ सुरू करावी. नोंदणी व नुतनीकरणातील ऑनलाइनचा त्रास कमी करून योजनेच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजप कामगार आघाडीने राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना सध्या खूप जाचक अटी नियमांमुळे मिळणाऱ्या लाभांपासुन वंचित राहावे लागत आहे. ही खेदजनक बाब आहे.

बांधकाम कामगारांना आता ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती असल्याने कित्येक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच जुन्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नुतनीकरण करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामगारांना मिळणाऱ्या लाभापासून बांधकाम कामगार वंचित राहत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळत असणाऱ्या अटल आहार योजनेतही सुसूत्रता नसल्याने मर्जीतील बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवरच ही योजना सुरू आहे. मग नाका कामगारांवर अन्याय का ? खरी गरज ही नाका कामगारांना असताना त्यांच्याकडे सरकार डोळेझाक करत आहे.

बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी लवकरात लवकर पूर्वी असणारी आरोग्य योजना (मेडिक्लेम) सुरू करण्यात यावी. राज्यातील बांधकाम कामगार जीवाची कसली पर्वा न करता मृत्यूच्या दाढेत काम करत असतो.

कामगारांच्या हितासाठी आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील शिल्लक असलेल्या रक्कमेतुन आरोग्य योजना (मेडिक्लेम) साठी निधी उपलब्ध करून त्याचा प्रिमियम तात्काळ भरण्यासाठी पुढाकार घ्यावा.

बांधकाम कामगार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना चांगली आरोग्यसेवा व चांगले उपचार मिळावेत. तसेच कामगार नवीन नोंदणी व नुतनीकरण यातील व योजनेचा लाभ देताना जाचक अटी कमी करून बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा” असे निवेदनात म्हटले आहे.

सरचिटणीस किशोर हातागळे, रंगनाथ पवार, उपाध्यक्ष सचिन शिंदे, काशिराम कर्डिले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.