Pimpri News : ‘म्युकरमायकोसिस’वरील गोळ्या, इंजेक्शनसाठी 27 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी गोळ्या, इंजेक्शनसाठी 27 लाखांचा खर्च झाला असून पिंपरी चिंचवड महापालिका  स्थायी समितीने या खर्चाला मान्यता दिली.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी 14 मे रोजीच्या पत्राद्वारे ॲम्फोटेरिसीन – बी 50 एमजी या इंजेक्शनच्या तीन हजार कुपी, पोसॅकोनॅझोल 100 एमजी या दोन हजार गोळ्यांची तातडीने आवश्यकता असल्याबाबत मध्यवर्ती भांडार विभागाकडे मागणी केली.

सद्यस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकरिता पोसॅकोनॅझोल 100 एमजी या गोळ्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बाजारातून मिळेल तेथून मिळेल त्या दराने या गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार, विनायक फार्मा यांच्याकडून एमएसडी या कंपनीच्या पोसॅकोनॅझोल 100 एमजी या दोन हजार गोळ्या खरेदी केल्या आहेत. 810 रुपये अधिक जीएसटी या दराने थेट पद्धतीने या गोळ्या खरेदीसाठी 16 लाख 20 हजार रुपये अधिक जीएसटी इतका खर्च झाला, तसेच इतर आठ पुरवठादारांकडून 1960 गोळ्या खरेदी केल्या. त्यासाठी 10 लाख 67 हजार रुपये खर्च झाला.

अरिहंत केमिस्ट एलएलपी यांच्याकडून पोसॅकोनॅझोल 300 एमजी, 16.7 मिलिलिटर या इंजेक्शनच्या आठ कुपी खरेदी करण्यात आल्या. त्यासाठी 54 हजार 400 रुपये, असा एकूण 27 लाख 41 हजार रुपये खर्च झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.