Pimpri news: प्रभुणे यांच्या संस्थेला किमान शक्य करनिर्धारणा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पूर नियंत्रण रेषेतील बांधकामाच्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पूर नियंत्रण रेषेबाबत बांधकामास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् या संस्थेला शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण प्रकल्पाच्या क्षेत्राला नियमानुसार किमान शक्य करनिर्धारणा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

गिरीश प्रभुणे यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीससंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आज (मंगळवारी) संबंधित अधिकाऱ्यांची विधानभवन, मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. प्रभुणे यांच्या संस्थेने मालमत्ता कर भरला नाही म्हणून जप्तीची नोटीस काढण्यात आली होती. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ मध्यस्थी केल्यानंतर नोटिसीस महापालिकेने स्थगिती दिल्याबद्दल प्रभुणे यांनी आभार मानले.

पिंपरी-चिंचवड येथील अनुदानित शैक्षणिक संस्थांना कर माफी देण्याबाबत काही निर्णय घेता येईल का याचा विचार करण्याची सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केली. बैठकीस पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, नगरविकास विभागाचे उप सचिव सतीश मोघे, ॲड.सतीश गोरडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चिंचवड येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित सर्व शैक्षणिक, सामाजिक प्रकल्पांतर्गत तीन हजार मुले शिक्षण घेत असून या ठिकाणी क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिर व क्रांतीवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे सर्व चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पहिली ते 12 वी पर्यंत शिक्षण देणारी सामाजिक शैक्षणिक संस्था चिंचवड गावठाणालगत आहे. ही जमीन चापेकर स्मारक समितीच्या मालकीची असून या जागेचा गावठाणामध्ये समावेश करण्याची शक्यता पडताळावी, अशा सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पवना नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाच्या निमित्ताने संस्थेच्या दोन्ही मुख्य जुन्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. यामुळे होणारी नुकसान भरपाई पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे.

संस्थेची इमारत बांधण्यास परवानगी द्यावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी मान्य करून योग्य कार्यवाही करण्यासाठी आश्वासित केले. गावठाणालगतच्या जमिनीचा समावेश गावठाणात केल्यास संस्था याठिकाणी बांधकाम करू शकेल. या शाळांचा सामाजिक प्रकल्पासाठी नियमानुसार चिंचवड गावठाणात समावेश करावा, असे निवेदन क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी दिले आहे.

यासंदर्भात ही भटक्या विमुक्तांची कौशल्यावर आधारित निवासी शाळा नामवंतांनी गौरविली असून याबाबत शासनस्तरावर दखल घेतली आहे. नियमानुसार संस्थेला कर माफी देण्यासंदर्भात काही निर्णय देण्याच्या सूचना यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पुल बांधण्याचे काम सुरू असल्याने संस्थेच्या इमारतीचे होणारी नुकसान भरपाई सदर संस्थेला देऊन इमारतीचे नवीन बांधकाम करण्यास नियमानुसार परवानगी देण्यात यावी. शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाशी चर्चा करून पूर नियंत्रण रेषेबाबत बांधकामास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या जातील. गावठाणालगतची जागा ही शेजारील रहिवाशी गट क्रमांकात घेण्याबाबत महसूल विभागाशी चर्चा करून नियमानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.