Pimpri news: पालिका बेघरांना प्रशिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभे करणार – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बेघरांसाठी निवारा केंद्र सुरू करुन त्यांना आधार देण्याचे काम सुरु केले आहे. या माध्यमातून बेघरांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात येणार आहे. हा पथदर्शी उपक्रम असून तो इतरांसाठी आदर्श ठरणारा आहे, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पिंपरी भाजी मंडई येथे शहरातील बेघरांसाठी निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त अजय चारठणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, बार्टी संस्थेच्या संगिता शहाडे, रियल लाईफ रियल पिपल संस्थेचे एम. एम. हुसेन, सी. वाय. डी. ए. संस्थेचे मॉथु, एनयुएलएमचे तांत्रिक तंज्ञ संजीव धुळम आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, महानगरपालिकेने सुरु केलेला निवारा केंद्राचा उपक्रम इतरांपेक्षा वेगळा आहे. याठिकाणी बेघरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या साठी स्वत:चा तात्पुरत्या स्वरुपात निवारा असावा यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

बेघरांबाबत नागरीकांमध्ये आस्था निर्माण झाली पाहीजे. तसेच ते देखिल देशाचे नागरीक आहेत. त्यांना आधार व सहानभुतीची गरज असून समाजाने सहकार्य केल्यास ते आपल्या आयुष्यात नव्याने उभारी घेऊ शकतील.

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, उपेक्षितांना जीवन जगता आले पाहीजे, तरच त्याला विकास म्हणता येईल, यासाठी पालिकेने सुरु केलेले निवारा केंद्र अशा गरजुंसाठी त्यांचे जीवनमान उंचावणारा आदर्श उपक्रम ठरणार आहे. बेघरांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाल्यास या माध्यमातून बेघर देखिल आपल्या पायावर उभे राहून नव्या उमेदीने जगण्याचा मार्ग निर्माण करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.