Pimpri News: महापालिकेची आगामी निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने होणार; अजितदादांचे संकेत

महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आक्रमकपणे आवाज उठावा; अजितदादांच्या राष्ट्रवादी नगरसेवकांना सूचना

युवा नेते पार्थ पवार यांचीही बैठकीला उपस्थिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भ्रष्टाचार करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी एकत्रित, आक्रमकपणे आवाज उठवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिल्या. तसेच 2022 ला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. महापालिकेची आगामी निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी, चिंचवड, भोसरीतील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांची पुण्यातील नवीन सर्किट हाऊस येथे आज (शुक्रवारी) बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, संजय वाबळे, श्याम लांडे , मोरेश्वर भोंडवे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. त्यावर तुम्ही सर्वांनी आवाज उठविणे आवश्यक आहे. विरोधी पक्षनेत्यांनी वेळ दिला पाहिजे. भ्रष्टाचाराचे पुरावे बाहेर आणावेत. आगामी निवडणुकीची व्यहरचना ठरविली पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे. त्यादृष्टीने कामाला लागा.

मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना ताकद द्यावी. गल्लीबोळात जावून जनतेची कामे करा. लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. आगामी महापालिकेची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक द्विसदस्यीय पद्धतीने पद्धतीने घेण्याबाबत विचार सुरु आहे. प्रभाग किती वाढतील, यावरही सविस्तर पवार यांनी चर्चा केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.