Pimpri Corona news: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची समस्या तीन दिवसांत संपेल – विकास ढाकणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी शासनस्तरावर व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्‍न तीन दिवसांत संपेल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी दिली.

शासनाचे आम्हाला आदेश असतात. शासनाच्या आदेशानंतर आम्ही काम करतो. लवकरच या अडचणींवर मात करू, असे देखील त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी यांची कोविड काळात डॉक्टरांना सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितमध्ये बैठक घेण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व हॉस्पिटल ओनर असोसिएशचे पदाधिकारी, डॉक्टर, हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. गणेश भोईर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

अतिरिक्‍त आयुक्‍त ढाकणे म्हणाले की, कोविड काळात येणार्‍या अडचणींमुळे व काळजीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गॅस पुरविणार्‍यांनी अचानक काही अडचणींमुळे गॅस देणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत शासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत.

रुग्ण संख्या वाढायला लागल्यानंतर काही कंपन्यांकडून लस बनविण्यास सुरूवात केली. हाफकिन कंपनीसोबत चर्चा सुरु आहे. महापालिकेकडे 2 हजार 500 रुग्ण असताना 1 हजार 500 रेमडेसिवीरची इंजेक्शन उपलब्ध होते. त्यामुळे वैद्यकीय विभागाची देखील कसरत होत आहे.

आमदार लांडगे म्हणाले की, सुमारे 15 हजार डॉक्टरांची शहरात नोंदणी केलेली आहे. त्यांना आम्ही विनंती केली की, कोविड सेंटर चालू करतो, तुम्ही ते हाताळावे. स्वतःच रुग्णालय सांभाळून डॉक्टरांनी ही कामे केली. मात्र महापालिका अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना महापालिका अधिकारी त्रास देत आहेत.

लोकप्रतिनिधी देखील संपर्क करत आहेत. नागरिक लोकप्रतिनिधींवर दबाव टाकत आहेत. नागरिकांना त्रास होतोय, त्या बद्दल लोकप्रतिनिधी या नात्याने माफी मागतो. मात्र या संकटातून नागरिकांना बाहेर काढायचे आहे, हा आपण ठाम निश्‍चय केला पाहिजे.

शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, मदत केली नाही की नागरिक नाराज होत आहेत. कोविडचे काम करणारे महापालिका अधिकारी व डॉक्टर यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी शहरातील तीनही आमदारांकडे मागण्यांचे निवेदन द्या, आम्ही मार्ग काढु. इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.