Pimpri News: भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करावे – महापौर  ढोरे

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी व पुणे विद्यापीठ अंतर्गत स्किल डेव्हलपमेंटच्या पहिल्या बॅचचे उदघाटन

एमपीसी न्यूज –  बदलत्या काळामध्ये तरुणांनी वर्तमान आणि भविष्यकाळाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण घ्यावे. नाविन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन  महापौर उषा  ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‍पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यामध्ये  “स्कील डेव्हलपमेंट” अंतर्गत उपक्रम सुरु करण्यासंदर्भात सामजंस्य करार करण्यात आलेला आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या बॅचच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमप्रसंगी महापौर ढोरे बोलत होत्या. ऑटो क्लस्टर, ऑडिटोरिअम, चिंचवड येथे आज (मंगळवारी) सकाळी झालेल्या या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, स्मार्ट सिटीचे संचालक प्रदीप कुमार भार्गव, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सिनेट सदस्य संतोष ढोरे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण, प्राचार्य शश‍िकांत पाटील उपस्थ‍ित होते.

महापौर ढोरे पुढे म्हणाल्या, स्मार्ट आणि इनोव्हेटिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून उद्योगांना लागणारे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. या उपक्रमातून पिंपरी चिंचवड शहरातील युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.  महापालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या उपक्रमास पुढे नेण्यास कटिबद्ध आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी संपूर्ण देशामध्ये एकमेव ठरेल असा हा उपक्रम पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड आणि राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाला शुभेच्छा‌ दिल्या.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे शहर एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारुपाला आले आहे. येथील औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उददेश्य आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगारनिर्मीती होत आहे. यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टिक) द्वारे सुरु करण्यात आलेला हा उपक्रम एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये (SAP Careers ABAP), (SAP Careers MM), (Microsoft Cloud Admin), (Linux Administration)  या चार कोर्सचा समावेश असून त्यानंतर ऑनलाईन – ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हददीतील अभियांत्रिकी, पदवीधर, विद्यार्थी, युवकांना पूर्ण वेळ रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याच्या हेतूने हा अभ्यासक्रम घेण्यात आलेला आहे. खासगी संस्थांकडून या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी  विद्यार्थ्यांना मोठी रक्कम मोजावी लागले. परंतु, हे सर्व कोर्स शहरातील विद्यार्थ्यांसाठी माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. सॅप करीअर एमएम (SAP Careers MM) या कोर्स साठी 26 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या अभ्यासक्रमाची 18 विद्यार्थ्यांसाठीची पहिली बॅच आज रोजी सुरु करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणा-या पुणे विद्यापीठातून दरवर्षी साडे सात लाख विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतात. त्यामुळे खूप मोठया प्रमाणात स्पर्धा वाढली असून आपल्या भागातील विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर जावू नये, यासाठी पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतलेला आहे. “इंडस्ट्री ४.०” हे ध्येय डोळयासमोर ठेवत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन” सेंटर स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबरच काळानुसार अद्ययावत ज्ञान देण्यासाठी स्मार्ट ट्रेनिंग आण‍ि इनोव्हेशन सेंटर (स्टिक) व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच “गेम चेंजर” ठरतील.

या नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक करणे गरजेचे आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणामुळे जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाशी संबंधित नसलेल्या युवकांना देखील तांत्रिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी साधता येतील. नव्याने आत्मसात केलेली कौशल्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना, उद्योगांना आवश्यक ठरेल असे प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी उपलब्ध होतील. शहराच्या आसपास असणाऱ्या उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उद्योगांवर आधारित असलेल्या महापालिकेच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्य माहिती व तंत्रज्ञान अध‍िकारी निळकंठ पोमण कार्यक्रमाचे आभार मानले. दरम्यान, कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला शंभरहून अध‍िक विद्यार्थी- पालक उपस्थ‍ित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.