Pimpri news: जिजामाता रुग्णालयात उद्या लसीकरणाची रंगीत तालीम; आयुक्तांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उद्या (शनिवारी) लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. त्याच्या तयारीची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पाहणी केली.

कोरोना वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त सुचनांनुसार कोरोना लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. शासन मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.

त्यासाठी महाराष्ट्रामधील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्हयांची निवड करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हयामधून निवडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात देखील लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये Conducting dry run for Covid-19 Vaccination अंतर्गत मॉक ड्रील (प्रात्यक्षिक) चे आयोजन करण्यात येणार आहे.

याची आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. बाळासाहेब होडगर व महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी पाहणी केली.

लसीकरणाच्या ड्रायरन मध्ये 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.