Pimpri news: होम आयसोलेशनमध्ये असताना बाहेर फिरल्यास गुन्हा दाखल होणार

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा इशारा

एमपीसी न्यूज – होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरण) असलेल्या रुग्णांनी होम असोलेशन नियमांचा भंग करुन ते घराबाहेर फिरल्यास त्यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. संबंधित सोसायटीच्या  चेअरमन यांनी या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावे; अन्यथा संपूर्ण  सोसायटी सिल करण्यात येईल, असा इशाराही   आयुक्त पाटील यांनी  दिला आहे. 

दुकानांमध्ये नियमापेक्षा अधिक गर्दी आढळून आल्यास तसेच कोरोना 19  प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास अशा दुकानधारकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या मार्च 2021मध्ये कोविड-19आजाराच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्त दालनात आज, गुरुवारी  प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला आदेश दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व झोनल रुग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मास्कचा वापर करणे,  सुरक्षित अंतर राखणे आदी नियम न पाळणाऱ्यांवर  नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नियमांचे प्रत्येकाने तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर  संबंधित क्षेत्रीय अधिका-यामार्फत कारवाई करण्यात येईल तसेच ते दुकान तात्काळ सील केले जाईल. शिवाय त्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता संबंधित दुकानदाराने घ्यावी,  असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

भाजी मार्केटमध्ये  समविषम पध्दतीने मार्केट चालु ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची मार्केट असोशिएशनने दक्षता घ्यावी; अन्यथा  संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

‘मी जबाबदार’ ही मोहिम शासनाने सुरु केली आहे. या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे,  सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने शहरात विविध ठिकाणी 50  केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली. सर्व ज्येष्ठ नागरिक  (60 वर्षावरील) व दुर्धर आजार असणा-यांनी (45 वर्ष वयावरील) लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही  आयुक्त पाटील यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.