Pimpri: विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी

एमपीसी न्यूज – मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ईव्हीएम’ मशीनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. ईव्हीएम मशिनबाबत सगळ्यांची वेगवेगळी मते आहेत. लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने ईव्हीएममध्ये गडबड होत असल्याचा संशय वाढला आहे. मशीनमधील चिप बदलली जाऊ शकते. जगातील प्रगत देशात निवडणूक बॅलेट पेपरवर होत आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी राज्याची आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

सांगवीत आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. आपले मत ज्याला दिले आहे. त्यालाच झाले आहे का याची मतदाराला माहिती कळणे आवश्यक आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईल. त्यासाठी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नसल्याचे अजित पवार म्हणाले.

लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनाधार मिळविणे. जनतेला विश्वास देण्याचे आमचे ठरलं असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, “विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत. जागा वाटपासंदर्भात काँग्रेस सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत. राज्याला दूरदृष्टी असलेले चांगले सरकार देणार आहोत.

यापूर्वी देखील निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत होते. परंतु , आता चौकशाची भीती दाखवून, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षातील आमदारांना फोडले जात आहे. काहीजण आपले काही खरे नाही, ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून पक्षांतर करतात. निष्ठेला महत्व दिले जात नाही. आम्ही देखील पक्षातील आमदार, पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतो. आमच्या देखील संपर्कात काहीजण आहेत. निवडून येण्याची क्षमता असल्याना घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

भिंती, इमारती पडण्याचा घटना घडत आहेत. नागरिकांचा जीव जात आहे. त्यावर काहीच कारवाई होत नाही. एकमेकांवर चुका ढकलण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी याला फोड, त्याला फोड, प्रलोभने दाखवून सत्ता मिळविण्यात दंग आहे. त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे.

आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. राज्यावर साडेचार लाख कोटींचा कर्जाचा बोजा आहे. महागाई वाढली, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. गेल्या पाच वर्षात किती जणांना रोजगार उपलब्ध करून दिला हे सरकारने जाहीरपणे सांगावे, असे आव्हान पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.