Pimpri : आयुष्याचा मुक्त प्रवास करणारी रणरागिणी ‘नीलिमा जाधव’

(श्रीपाद शिंदे )

एमपीसी न्यूज – आयुष्याचे स्वत्व ओळखून त्यानुसार प्रवास करत, आपल्या कार्याची पावती जगाकडून घेण्याऐवजी स्वतः स्वतःला ओळखून स्वतःची मतं तयार करून मनमोकळे, मनमुराद, यथेच्छ जगणारी रणरागिणी म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा श्रीरंग जाधव. कोणतीही वाहने चालवण्याची प्रचंड आवड असल्याने विशेषतः बुलेट चालविण्याचे वेड असल्याने यांना ‘बुलेटवाली’ या नावाने देखील काहीजण ओळखतात. ‘तुमचं बोलणं, चालणं, वागणं, एखाद्या विषयी मत मांडण्याची शैली यातून तुमचं व्यक्तिमत्व इतरांच्या लक्षात राहतं’ हा यशस्वी आयुष्याचा मूलमंत्र त्या सहज सांगतात. जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांच्याविषयी…..

नीलिमा जाधव यांचा जन्म सातारा शहराजवळ असलेल्या क्षेत्र माहुली या गावात शेतकरी कुटुंबात झाला. दोन बहिणी, दोन भाऊ, आई, वडील, चुलते असा त्यांचा मोठा परिवार होता. ऑलम्पिकपटू आणि स्वातंत्र्यानंतर लालमातीचा आखाडा गाजवलेले कुस्तीगीर श्रीरंग जाधव यांच्या त्या कन्या आहेत. आधुनिक मॅट आणि लाल मातीत चपखलपणे कुस्ती खेळत समोरच्या मल्लांना चारी मुंड्या चीत करणारे श्रीरंग जाधव हे पहिले कुस्तीगीर होते. 1952 च्या ऑलम्पिक स्पर्धेत त्यांनी खाशाबा जाधव यांच्यासोबत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे अगदी जन्मापासूनच लालमाती, बहादुरी, साहस यांचे बाळकडू नीलिमा यांना मिळाले.

  • लहानपणापासून त्यांना घोडेस्वारी, क्रिकेट, पोहणे यांसारखे छंद होते. शालेय जीवनात असताना शेतीची कामे देखील त्या करत असत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून बी. कॉम. आणि डिप्लोमा इन बिजनेस मॅनेजमेंट केले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कविता करणे, शेतात फिरणे, प्रवास करण्याचे छंद जोपासले. त्यांच्या वडिलांकडे रॉयल इन्फिल्ड बुलेट (एमएचजे 3536) होती. ती बुलेट भावाच्या मदतीने त्या प्रथम चालवायला शिकल्याची आठवण त्या आवर्जूनपणे करून देतात. 1980 च्या दशकात एखाद्या मुलीने बुलेट चालवायला शिकणे आणि डॅशिंगमध्ये फेरफटका मारणे ही म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नव्हती. पण, उत्तम संस्कारांच्या मदतीला डॅशिंगपणा असायलाच हवा, त्यामुळेच अशा गोष्टी शक्य होतात, असेही त्या म्हणतात.

वैमानिक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. वैमानिक होण्यासाठी त्यांच्या घरातून त्यांना विरोध नव्हता, पण, सातारासारख्या शहरात त्याबाबत जास्त माहिती नाही, त्याचबरोबर सामाजिक बंधनांमुळे त्यांचे स्वप्न बाजूला राहिले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. वैमानिक होण्याचे स्वप्न बारगळल्यानंतर त्यांनी पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदासाठी परीक्षा देण्याचे निश्चित केले. काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना त्या परीक्षेत यश मिळाले नाही, मात्र ध्येयाकडची वाटचाल त्या चिकाटीने करत राहिल्या आणि अखेर त्यात त्यांना यश मिळाले. 1987 साली त्या महाराष्ट्र पोलीस सेवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या. कुटुंबातील नोकरी करणा-या किंवा पोलीस अधिकारी असणा-या नीलिमा जाधव पहिल्या महिला ठरल्या.

  • वडील मुक्त स्वभावाचे होते. आई कमी शिकलेली पण, तिचे विचार खूप मोठे होते. संकुचित विचार त्यांच्या कुटुंबात कधीच नव्हता. त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव त्यांच्यात कधीच झाला नाही. जी कामे मुलांना यायला हवी, तीच मुलींना आणि जी कामे मुलींना यायला हवी, तीच मुलांना सुद्धा यायला हवी, असा कयास त्यांच्या घरात होता. त्यांची आई मागील 50 वर्षांपासून शेती करते. वयाच्या 82 व्या वर्षी देखील आई शेतात जाण्यासाठी धडपडते. पण, शरीर अस्वास्थ्यामुळे त्या जाऊ शकत नाहीत. कष्टाला पर्याय नाही, हा मूलमंत्र त्यांच्या आई त्यांना वेळोवेळी देतात.

पोलीस अधिकारी असल्यामुळे कामाची वेळ निश्चित नसली तरी देखील आठवड्यातील ठराविक वेळ त्या स्वयंपाक घरासाठी देतात. मांसाहार आणि शाकाहार अशा दोन्ही प्रकारचा त्या स्वयंपाक उत्तम प्रकारे करतात. आपला आधार आपणच शोधायला हवा. आपला आधार शोधण्यासाठी इतरांचा आधार घेतला, तर मिळणारा आधार कदाचित कमकुवत असेल, असे त्या मानतात. त्यामुळे निरखण्याची, पारखण्याची आपली शक्ती कमी होते. जे आपल्याजवळ आहे, ते वृद्धिंगत करायला हवे. त्यामुळे कोणत्याच गोष्टीसाठी इतरांच्या आधाराची त्या काठी बाळगत नाहीत.

  • महिला पोलिसांबद्दल बोलताना त्या म्हणतात, “महिला पोलीस दिवसभर शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये आपले कर्तव्य बजावत असतात. अजूनही शहरात काही ठिकाणी महिलांसाठी ठिकठिकाणी शौचालये उपलब्ध नाहीत. त्याचा महिला पोलिसांसह अन्य महिलांना देखील नाहक त्रास होतो. महिला पोलिसांच्या काही मूलभूत समस्या आहेत. पण, त्या अडचणींमध्ये खचून न जाता समस्येचे समाधान त्या शोधत आहेत.”

वाहन चालकांनी स्वयं शिस्त पाळायला हवी. घालून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणारच. विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांवर विशेषत्वाने सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास संबंधित वाहनचालकांवर भारतीय दंड विधान कलम 279 अन्वये गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी, असे आवाहन देखील सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव यांनी केले.

  • सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांचा कार्यकाळ –
    1987 साली महाराष्ट्र पोलीस दलात रुजू.

सेवा :
# 1988 साली मुंबई विमानतळ सुरक्षा, अंमली पदार्थ विरोधी पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक, विशेष शाखेत काम
# 1994 साली पुणे शहर महिला विभाग
# 1995 साली पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा
# 2000 साली पुणे शहर वाहतूक विभाग
# 2004 पुणे शहर विशेष शाखा
# 2005 साली पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने गुन्हे अन्वेषण विभाग
# 2009 साली रत्नागिरी जिल्हा पोलीस दल
# 2011 मध्ये पुन्हा पुणे शहर वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला विभाग
# 2016 साली सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीने नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे रीडर म्हणून नियुक्ती
# 2019 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग येथे कार्यरत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.