Pimpri: महापालिकेच्या ‘वायसीएमएच’ रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

मेंदूची गाठ काढून महिलेला दिले जीवनदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘वायसीएमएच’ रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड असलेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका 30 वर्षीय महिलेच्या मेंदूमध्ये गाठ तयार झाली होती. महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याबरोबरच आवाज जाण्याची भीती अधिक असल्याने केवळ शस्त्रक्रिया केल्या जाणा-या भागात भुल देऊन मेंदूची गाठ काढून महिलेला जीवनदान देण्याची किमया तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केली आहे. ही शस्त्रक्रिया शहरात पहिल्यांदाच झाली असून महापालिकेच्या रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर, एका व्यक्तीच्या कवटीमध्ये हाड घुसले होते. दुर्बिणद्वारे ती शस्त्रक्रिया यशस्वी केली असू हा रुग्ण आता व्यवस्थित चालत आहे. वायसीएमएच रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांना जीवनदान दिले आहे.

या दोन्ही शस्त्रक्रियेची माहिती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. मेंदूतज्ज्ञ डॉ. अमित वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया झाल्या. डॉ. हर्षद चिपडे, डॉ. मारूती गायकवाड, डॉ. प्रविण सोनी, परिचारिका शेटे, युनूस पगडीवाले यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी उपस्थित होते.

  • एक तीस वर्षीय गर्भवती महिलेला चक्कर येत होती. तपासणी केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे समोर आले. स्थायू, कवटी, त्वचा याची एकत्र शस्त्रक्रिया करत ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करताना संबधित रूग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याबरोबरच आवाज जाण्याची भीती अधिक असल्याने केवळ शस्त्रक्रिया केल्या जाणा-या भागात भूल देत संबधित रूग्णाबरोबर बोलत ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. तीन तास ही शस्त्रक्रिया चालली. पिंपरी-चिंचवड भागात पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया पार पडली असून यासाठी खासगी रूग्णालयात 8 ते 10 लाख रूपयांचा खर्च येतो. मात्र, वायसीएमएचमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तर, पांडूरंग तरगे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ते चालताना अचानक पडत होते. कोणता आजार झाला याचे निदान होत नव्हते. त्यांना उपचारासाठी ‘वायसीएमएच’मध्ये दाखल केले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कवटीमध्ये हाड घुसले होते. त्यांच्या कवटीमध्ये मानेचे हाड घुसले असल्याने त्यांना चक्कर येत होती. त्यांना काम करताना अडचण येत होती. रूग्णालयात असलेल्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून दूर्बिनीद्वारे ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. सध्या हा रूग्ण चालत आपले हात-पाय हलवित असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.

डॉ. राजेश वाबळे म्हणाले, ”वायसीएमएच रूग्णालयात दररोज हजारो रूग्णांवर उपचार केले जातात. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी वायसीएम रूग्णालयामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता दिलेली आहे. याची यंदाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून विविध विषयातील 23 तज्ज्ञ डॉक्टर आता रूग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून 24 तास कार्यरत राहणार आहेत. वायसीएममध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने खासगी रूग्णालयात काही लाख रूपये खर्च करून केल्या जाणा-या शस्त्रक्रिया गरीब आणि गरजू रूग्णांवर नाममात्र दरात केल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढली आहे”.

  • सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले,”वायसीएएमच रुग्णालय अनेक रुग्णांना वरदान देत आहे. अवघड शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. या शस्त्रक्रिया खासगी नामांकित रुग्णालयात देखील केल्या जात नाहीत. वायसीएमएच रुग्णालय आयुष्याची सुरुवात करणारे आहे. वायसीएमएच रुग्णालयाचा दर्जा सुधारला आहे. पदव्युत्तर संस्था सुरु झाली आहे. त्यामुळे वायसीएमएचसाठी अनेक डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.