Pimpri : पिंपरी-चिंचवडमधून विधानसभेसाठी आयात उमेदवार नको; मनोज कांबळे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आणायचे असतील, तर इथे आयात उमेदवारांना संधी न देता स्थानिकांना संधी द्यावी. अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एनएसयुआयचे) माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात उमेदवारीबाबत नवीन प्रयोग करणे विधानसभा निवडणुकीत देखील फसू शकतो, असेही कांबळे यांनी सांगितले आहे.

मनोज कांबळे हे नॅशनल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मागील वेळी विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी याप्रकरणी अजित पवार यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापक विचारसरणीतून झालेला आहे.  या शहराचा नावलौकिक जगभर पसरवण्याचे काम आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेले आहे.

देशामध्ये आघाडीचे सरकार असताना जेएनएनआरयुएम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत पिंपरी-चिंचवड शहराला देण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास झालेला आहे. अजूनही या शहरांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करताना काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरातील किमान एक मतदार संघ सोडावा. यामुळे आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक आणि पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या उमेदवारास प्राधान्य द्यावे. उमेदवारीबाबत कोणताही नवीन प्रयोग केल्यास या शहरातील जनता योग्य प्रतिसाद देईल असे वाटत नाही. अन्यथा पिंपरी मतदारसंघ काँग्रेस पक्षाला द्यावा.

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने या मतदारसंघांमध्ये विजयश्री खेचून आणून आपले हात बळकट करेल. पिंपरी मतदारसंघांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी. आयात उमेदवार दिल्यास जनता योग्य प्रतिसाद देणार नाही. आघाडीकडून अशा प्रकारचा कोणताही प्रयोग करू नये, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.